मणिरामचा जीव वाचवला होता वत्सलाने.
“आम्ही पांडव धबधब्यापाशी गेलो होतो,” मणिराम सांगू लागतो. “वत्सला गेली होती चरत चरत. मी तिला परत आणायला म्हणून गेलो आणि अचानक एक वाघ आला.”
मणिरामने मदतीसाठी पुकारा केला, “ती पळत पळत आली आणि आपला पुढचा पाय तिने उंचावला. म्हणजे मला तिच्या पाठीवर बसता आलं असतं. मी पाठीवर बसल्यानंतर तिने आपले पाय जोरात जमिनीवर आपटले आणि काही झाडं तोडून टाकली. वाघ? भाग गया,” सुटकेचा निःश्वास टाकत मणिराम माहूत सांगतो.
पन्ना व्याघ्र प्रकल्पातली ही वत्सला १०० वर्षांहून मोठी असल्याचं सांगितलं जातं. जगातली हयात असलेली सगळ्यात वयोवृद्ध हत्तीण आहे ती. “काही जण सांगतात ती ११० वर्षांची आहे, काही म्हणतात ११५. आणि खरंच असेल त्यांचं म्हणणं,” गोंड आदिवासी मणिराम सांगतो. १९९६ पासून तो तिचं सगळं पाहतोय.
वत्सला आशियाई हत्तीण आहे. केरळ आणि मध्य प्रदेशची रहिवासी आहे. ती आता फार प्रेमळ झालीये पण तरुणपणी एकदम धडाकेबाज होती ती, मणिराम सांगतो. अगदी आजही दिसायला आणि ऐकायला कमी येत असलं तरीही कुठे काही धोका असेल तर त्याची पहिली चाहूल वत्सलालाच लागते.
मणिरामच्या सांगण्यानुसार तिची घ्राणेंद्रियं अजूनही उत्तम काम करतायत आणि त्यामुळेच इतर कुणी जनावर आसपास आलं तर तिला ते लगेच समजतं. अशा वेळी ती लगेच सगळ्या कळपाला सूचना देते आणि सगळे जण एका ठिकाणी गोळा होतात. पिलं सगळ्यात आतमध्ये. “एखाद्या प्राण्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर सगळे मिळून त्याला पळवून लावतात. सोंडेने वाटेतले दगड, फांद्या उचलून फेकतात,” मणिराम सांगतो आणि कौतुकाने म्हणतो, “पहले बहुत तेझ थी.”










