उमेश केदार कोयता उचलतात आणि उसाच्या मुळावर घाव घालतात. एक झाला की लगेच दुसरा, मग पुढचा, मग त्या पुढचा. ऊस तोडायला शक्ती लागते आणि जोर, आणि ते सूर्य भर माथ्यावर तळपत असताना चार एकर रानात काम करतायत. “आम्ही पहाटे ५.३० ला सुरुवात केलीये आणि ७ वाजेपर्यंत तरी काही आम्ही थांबत नाही,” समोरच्या उसावरची नजर न हलवता ते सांगतात. “गेल्या अडीच महिन्यापासनं [नोव्हेंबरपासून] दर दिवस असाच हाय माजा, आन् पुढले अडीच महिने बी असेलच असनारेत.”
त्यांची पत्नी मुक्ता उमेशनी तोडलेला ऊस आणून दहा दहा उसाच्या मोळ्या बांधतीये, दोरी म्हणून वरचं पाचट. मग ही मोळी डोक्यावर तोलत, तोड झालेल्या रानातून, निसरड्या वाटेने रानात उभ्या ट्रकपाशी पोचते. “थोड्या वेळानं आम्ही कामाची अदलाबदल करतो,” ती सांगते. “हा सगळा काळ आमचे हात आणि खांदे दुखत राहतात. काम तर करायला पाहिजे म्हणून मग आम्ही गोळ्या खातो, दुखणं थांबायच्या.”
उसावर कोयत्याचे सपासप वार होतायत आणि तो आवाज साऱ्या रानात भरून राहिलाय. बीड जिल्ह्याच्या वडवणी तालुक्यातल्या सोननाखोटा गावातल्या या रानात दहा जोडपी तोड करतायत. उमेश आणि मुक्तासारखे काही जण शेतकरी आहेत तर बाकीच्यांकडे जमीन नाही. तीन एकरावरची कपास नफ्याची ठरत नसल्यामुळे गेल्या १० वर्षांपासून त्यांना ऊस तोड कामगार म्हणून काम करावं लागतंय. “तोडीच्या शेवटी आमच्या हातात फार काही पैसा येत नाही,” उमेश सांगतात. “पण काही तरी कमाई तर होते ना.”







