“आम्हाला घोर लागला होता की आमचे वडील गेल्यावरही त्यांना मानाने निरोप दिला जाणार नाही.”
पंचनाथन सुब्रमण्यम वारले त्याला दोन महिने उलटून गेल्यानंतरही त्यांचा मुलगा एस. रमेश अजूनही शोक करतोयः “आम्ही त्यांना कोविड-१९ ची लक्षणं दिसू लागल्यावर तंजावुरच्या सरकारी रुग्णालयात दाखल केलं, तेव्हा आमच्या मनातही आलं नव्हतं की इथून आम्ही त्यांचा निष्प्राण देह परत घेऊन जाऊ.”
भारतीय सैन्यदलाच्या कारकुनी नोकरीतून ६८ वर्षीय सुब्रमण्यम निवृत्त झाले त्यालाही बरीच वर्षं लोटली. त्यांना तब्येतीच्या मोठ्या काहीच तक्रारी नव्हत्या म्हणूनही कुणाच्या मनाला शंका शिवली नव्हती. सैन्याशी असलेली नाळ त्यांच्यासाठी गर्वाचा मुद्दा होती आणि “ते त्यांच्या तब्येतीची व्यवस्थित काळजी घ्यायचे. रोजचं चालणं आणि काटेकोर खाणं त्यांनी कधीच सोडलं नाही,” रमेश सांगतात. ४० वर्षीय रमेश मूळचे तमिळ नाडूच्या कुंबकोणमचे आहेत. “त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं तेव्हाही आम्हाला वाटत होतं की ते बरेच होणार आहेत.”
पण मग १४ ऑगस्टला जेव्हा सुब्रमण्यम यांचा मृत्यू झाला तेव्हा या कुटंबावर आभाळ फाटलं. आणि केवळ ते गेले इतकंच त्यामागचं कारण नव्हतं. राज्यभरात कोविड-१९ मुळे मृत्यू म्हणजे कलंक बनला असल्याचं त्यांनी पाहिलं होतं. त्यामुळे पुढे काय करायचं हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. “मित्र, नातेवाइकांची काहीही मदत झाली नाही,” रमेश सांगतात. “अर्थात तेही समजून घेण्यासारखंच आहे कारण करोनामुळे मृत्यू हा मोठा चिंतेचा विषय आहे.”
आणि तेव्हाच अगदी अनपेक्षितपणे त्यांना काय करायचं याची प्रत्यक्षात सगळी मदत मिळाली. तमिळ नाडू मुस्लिम मुन्नेत्र कळघम (तमुमुक) – या तमिळ नाडूतल्या एका सामाजिक संस्थेकडून. सुब्रमण्यम यांच्या मृत्यूनंतर थोड्याच वेळात, तमुमुकचे सहा सेवाभावी कार्यकर्ते या कुटुंबांना मदत करण्यासाठी तिकडे हजर झाले – अगदी पार्थिव ताब्यात घेण्यापासून ते त्यांच्या गावी, कंबकोणला जाऊन मानाने त्यांचा दफनविधी करेपर्यंत सगळं त्यांनी केलं (काही हिंदू जातींमध्ये पार्थिवाचं दहन न करता दफन करतात).
या कुटुंबाचं नशीब फारच चांगलं होतं. तमुमुकसाठी मात्र सुब्रमण्यम यांचे अंत्यविधी मार्च महिन्यापासून तमिळ नाडू आणि पुडुच्चेरीमध्ये त्यांनी केलेल्या १,१०० विधींपैकी एक होते. मरण पावलेल्या व्यक्तीची जात किंवा जमात कुठलीही असो – धर्माला आणि कुटुंबियांच्या इच्छेला अनुसरून हे अंत्यविधी केले आहेत. कोविड-१९ मुळे मृत्यू झाला असल्यास स्थानिक प्रशासनाच्या नियमावलीप्रमाणे त्यांनी आठ फूट खोल खड्डा खणून दफन केलं आहे.









