“या सरकारला सांगते, तुमी झोपलायसा, झोपू नका...”

असं खडसावून सांगणारं दुसरं कोण असणार? लढवय्या स्वातंत्र्य सैनिक, वीरांगना, शेतकरी, गरीब आणि वंचितांच्या न्यायाच्या बाजूने सातत्याने उभ्या असलेल्या हौसाताई पाटील. २०१८ साली नोव्हेंबर महिन्यात दिल्लीत संसदेवर शेतकऱ्यांनी जो भव्य मोर्चा काढला तेव्हा हौसाताईंनी हा संदेश पाठवला होता.

“शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव मिळाला पाहिजे,” त्या अधिकार वाणीने सांगतात. “आणि असा न्याय मिळवण्यासाठी मी स्वतः तिथे येणार आहे,” मोर्चात सामील होणार आहे, त्यांनी आपल्या संदेशातून आंदोलकांना वचन दिलं होतं. तेव्हाच त्यांचं वय ९३ च्या आसपास होतं, तब्येत ठीक नव्हती, तरीही. आणि सरकारचे तर त्यांनी कानच उपटले होते, “झोपलायसा. झोपू नका. उठा आणि गरिबासाठी काम करा.”

पण, २३ सप्टेंबर २०२१ रोजी कायम सतर्क, जागरुक असणाऱ्या हौसाताई सांगलीत वयाच्या ९५ व्या वर्षी चिरनिद्रेत विलीन झाल्या.

१९४३-४६ या काळात हौसाताई भूमीगत राहून जहाल कारवाया करणाऱ्या तूफान सेनेत आघाडीवर होत्या. इंग्रजांवर हल्ले करणं, त्यांच्या पगाराच्या गाड्या, पोलिसांकडची शस्त्रास्त्रं लुटणं, प्रशासनासाठी आणि कधी कधी न्यायनिवाडे करण्यासाठी वापरले जाणारे डाक बंगले जाळणं अशा अनेक क्रांतीकारी कारवायांमध्ये त्या सहभागी होत्या. १९४३ साली इंग्रजी राजवट झुगारून स्वातंत्र्य मिळाल्याचं जाहीर करणाऱ्या साताऱ्यातल्या प्रति सरकारची सशस्त्र सेना म्हणजे तूफान सेना. हौसाताई तूफान सेनेचं काम करायच्या.

१९४४ साली त्यांनी गोव्यातही भूमीगत कारवायांमध्ये भाग घेतला होता. त्या काळी गोवा पोर्तुगिजांच्या अंमलाखाली होतं. रात्रीच्या अंधारात लाकडाच्या एका संदुकीवर बसून त्या आपल्या सहकाऱ्यांसोबत मांडवी नदी पार करून आल्या होत्या. पण असा काही विषय निघाला की त्यांचं म्हणणं असायचं, “मी स्वातंत्र्य संग्रामात थोडं फार, छोटं मोठं काही काम केलं... फार मोठं काही मी केलेलं नाही.” हौसाबाईंची अनाम शौर्यगाथा या कहाणीमध्ये त्यांच्याविषयी अधिक जाणून घ्या. माझी स्वतःची ही अत्यंत आवडती गोष्ट आहे.

इंग्रजांच्या गाड्यांवर हल्ले करणं, पोलिसांची शस्त्रास्त्रं लुटणं आणि डाक बंगल्यांत जाळपोळ करणं अशी कामं करणाऱ्या क्रांतीकारकांमध्ये हौसाताई आघाडीवर होत्या

व्हिडिओ पहाः ‘सरकारला माझं सांगणं आहे, झोपलायसा, झोपू नका.’

त्यांचं निधन झालं त्याच दिवशी मी पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांशी त्यांच्याबद्दल बोलत होतो. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाचे खरे शिलेदार या पिढीला कधी कळलेच नाहीत. देशभक्ती आणि भारतीय राष्ट्रवादावर त्यांच्याइतक्या अधिकारवाणीने बोलणारं आज दुसरं कोण आहे? आज जे ऊर बडवतायत ते सगळे नकली, बुजगावणी आहेत. त्यांची देशभक्ती म्हणजे इंग्रजांच्या साम्राज्यशाहीपासून भारतीयांना मुक्त करणं, त्या विरोधात त्यांची एकजूट करणं. जात किंवा धर्माच्या आधारावर लोकांमध्ये फूट पाडणं हे त्यांच्या राष्ट्रवादात कधीच बसणारं नव्हतं. एक अशी धर्मनिरपेक्षता जी आशेवर आधारित होती, द्वेषावर नाही. त्या स्वातंत्र्याच्या सैनिक होत्या, कर्मठ धार्मिकतेच्या नाही.

पारीसाठी त्यांची आम्ही मुलाखत घेतली ते क्षण मी कधीही विसरू शकणार नाही. मुलाखत संपता संपता त्या मला म्हणाल्या, “मंग, आता मलाही घेऊन जाणार का नाही?”

“कुठे, हौसाताई?”

“तुमच्यासंगं, पारीमध्ये काम कराया,” हसत हसत त्या म्हणाल्या होत्या.

‘स्वातंत्र्याचं पायदळः भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाचे अखेरचे शिलेदार’ या पुस्तकाचं सध्या माझं काम सुरू आहे. या पुस्तकातला एक विभाग हौसाताईंच्या झपाटून टाकणाऱ्या जीवनकहाणीवर आहे. पण तो वाचायला स्वतः हौसाताई मात्र आज या जगात नाहीत. यापरती दुःखाची बाब माझ्यासाठी दुसरी काय असणार?

पी. साईनाथ पीपल्स अर्काईव्ह ऑफ रुरल इंडिया - पारीचे संस्थापक संपादक आहेत. गेली अनेक दशकं त्यांनी ग्रामीण वार्ताहर म्हणून काम केलं आहे. 'एव्हरीबडी लव्ज अ गुड ड्राउट' (दुष्काळ आवडे सर्वांना) आणि 'द लास्ट हीरोजः फूट सोल्जर्स ऑफ इंडियन फ्रीडम' (अखेरचे शिलेदार: भारतीय स्वातंत्र्यलढ्याचं पायदळ) ही दोन लोकप्रिय पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत.

यांचे इतर लिखाण साइनाथ पी.
Translator : Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.

यांचे इतर लिखाण मेधा काळे