“मुलं काही डोल्लू कुनिथात इतकी तरबेज नाहीयेत,” १५ वर्षांची विजयलक्ष्मी सरळ सांगते. “आम्ही नक्कीच जास्त चांगलं वाजवतो.”
आणि ते खरंच आहे. लहान चणीच्या या मुली, त्यांच्या शेलाट्या कंबरेला हे मोठे अवजड ढोल बांधलेले, एखाद्या निपुण नर्तकीप्रमाणे आणि कसरत करणाऱ्यांप्रमाणे लवचिकतेने फेर धरतायत. पूर्ण वेळ एकदम तालात, एकमेकींशी एकदम सुसंगत.
या सगळ्या लहान मुली आहेत. त्यांच्यापैकी सगळ्यात मोठ्या असणाऱ्याही अजून मोठ्यांमध्ये गणल्या जात नाहीत. पण ज्या सहजतेने आणि जोशात त्या हा शक्तीचा कस पाहणारा ढोलनृत्य प्रकार सादर करतात ते खरंच अचंबित करून टाकणारं आहे. डोल्लू कुनिथा हे कर्नाटकातलं एक लोकप्रिय लोकनृत्य आहे. डोल्लू म्हणजे ढोल आणि कुनिथा म्हणजे कानडीत नाच. यालाच “गंडू काले” – “पुरुषांचं कौशल्य” किंवा “पुरुषांची कला” असंही म्हणतात. हे धिप्पाड पुरुष १० किलोची ढोल आपल्या कंबरेला बांधून वेगाने आणि जोशात नाचतात. लोक असं मानतात की या नाचप्रकारासाठी शक्तीमान आणि दमसास असलेले धिप्पाड पुरुषच पाहिजेत.
अर्थात, काही तरुण मुलींनी ही चाकोरी मोडायचा प्रयत्न करेपर्यंत तरी असाच समज होता. आणि ही चाकोरी मोडली गेली, अगदी इथे, हेसरगट्टात. बंगळुरूच्या वेशीवर, शहराच्या मध्यभागापासून ३० किमी अंतरावर भाताचं खाचरं आणि माडा-पोफळीच्या सान्निध्यात. आणि या सगळ्या हिरवाईत या मुलींची टोळी अशा प्रथा आणि रिवाज बदलू लागल्यात. या प्रकारचा डोल्लू कुनिथा मुलींसाठी नाही ही संकल्पनेलाच त्यांनी आव्हान दिलंय. त्यांनी हे जुनाट मिथक बाजूला टाकलंय आणि वजनदार ढोल हातात घेतलाय.





