ज्या जमिनीत कमला देवी काम करतायत, तिथनं वेदनेचे आणि गतस्मृतींचे हुंकार त्यांना वेढून टाकतायत. कधी काळी त्यांची १८ एकर जमीन होती. “माझ्या हाताखाली मजूर कामं करायचे, आज मीच त्यांच्यातली एक झालीये,” त्या म्हणतात, शांतपणे.
कमला थारू समुदायाच्या आहेत. ही अनुसूचित जमात हिमालयाच्या पायथ्याशी असणाऱ्या उधम सिंग नगर या सुपीक प्रदेशातल्या जिल्ह्यात मोठ्या संख्येने वास्तव्याला आहे. त्यांच्या समुदायाचे लोक उत्तराखंडमध्ये सर्वात आधी वसले असं मानं जातं आणि तेच सध्या सर्वात वंचित असल्याचंही दिसतं.
ज्या राज्यात दर ३५ माणसांमागे एक आदिवासी आहे, तिथे त्यांच्यासारख्या अनेकांच्या जमिनी बिगर-आदिवासींनी बळकावल्या आहेत. कमलासाठी मात्र जमीन तर गेलीच आणि सोबत अमर्याद काळाच्या कमी व्याजाच्या कर्जांची वचनं मात्र राहिली.
“माझ्या सासऱ्यांच्या आजारपणात आम्हाला पैशाची गरज होती. आणि त्यांच्यानंतर माझ्या नवऱ्यासाठी. आणि नणंदा होत्या लग्नाच्या...” त्यांच्या आवाज हवेत विरून जातो.
कमला, वय ४७, सुमारे २८ वर्षांपूर्वी सितारगंज तहसिलातील पिंडारी गावात नवीन नवरी बनून आल्या. तेव्हा त्यांचे सासरे, टोला सिंग एक समृद्ध शेतकरी होते. त्यांचं कुटुंब किती समृद्ध होतं हे सांगण्यासाठी त्या आपल्या अंगणाच्या दिशेने या टोकाकडून त्या टोकाला हात फिरवतात आणि म्हणतात, “कापणीच्या काळात ही सगळी जमीन पिकांनी डोलत असायची. लाला (व्यापारी) आमच्याकडून गहू आणि तांदूळ विकत घेण्यासाठी त्यांची माणसं पाठवायचे ट्रक घेऊन,” त्या सांगतात.







