वित्तो पांडेंना संडासपर्यंत पोचायला ६० पावलं चालत जावं लागतं. त्या खडबडीत रस्त्यावरून त्यांना एकटीला काही जाता येत नाही. कधी कधी तर कुणी तरी त्यांना हाताला धरून नेईल अशा आशेत त्या तासंतास वाट पाहत बसतात. “मी सारखी पडते. मग मी पडते आणि उठून उभी राहते. एकदा तर एका बैलाने मला उडवलं, नंतरचे किती तरी दिवस माझं अंग सुजलं होतं,” त्या सांगतात.
जन्मांध असणाऱ्या वित्तोंना शक्यतो त्यांच्या वहिनी, गीता संडासला घेऊन जातात. “कधी कधी त्या आवाज देतात तेव्हा माझं काही तरी काम चालू असतं. अडचण होते अशा वेळी,” गीता म्हणतात. त्या स्वतः उघड्यावर शौचाला जातात. “संडासात नळाला पाणी नाही, त्यामुळे तो खूपच घाण होतो. काही उपयोग नाही त्याचा,” त्या सांगतात. त्यांचा नवरा सनातक, वित्तोंचा सगळ्यात धाकटा भाऊ. लखनौ जिल्ह्यात्या गोसाईगंज तालुक्यातल्या बखारी या आपल्या गावी तो कुटुंबाची एक बिघा (०.६ एकर) जमीन कसतो.
बखारीतले बहुतेक संडास, जे घरांपासून बरेच दूर आहेत आज मोडकळीला आलेत आणि त्यांचा वापर करणं शक्य नाही. अगदी साधा संडासही उपलब्ध नसल्यामुळे गावकऱ्यांना किती तरी तास कळ काढावी लागते, लांब चालत जावं लागतं आणि मानहानी सहन करावी लागते.
तारावती साहू गृहिणी आहेत. कितीदा तरी असं झालंय की पोट बिघडल्यावर पांदीपर्यंत जाईपर्यंत कुणाच्या तरी घरासमोरच कपडे खराब व्हायची वेळ आलीये. “किती लाजिरवाणं वाटतं अशा वेळी. शेजारी पाजारी वाईट नजरेने पाहतात. माझं पोट बिघडल्यावर ताबा राहत नाही. कधी कधी तर जिथे संडास झाली ती वाट मी दिवसातून पाच पाच वेळा धुऊन काढलीये,” त्या सांगतात. पांदीचा रस्ता अगदी ५ मिनिटाचा असला तरी त्यांच्यासाठी तो लांब आहे. त्यांचे पती ७२ वर्षीय, माता प्रसाद साहूदेखील आता तब्येतीमुळे त्यांची तीन बिघा जमीन कसू शकत नाहीत. त्यांचीही तीच गत आहे. “आम्ही किती जणांना विनवण्या केल्या असतील. पण कुणीच दाद देत नाही. आता संडासची मागणी करून थकलीये मी,” त्या म्हणतात.






