नामदेव तराळे शेतात येतात आणि जरासे थांबतात. मुगाचे वेल तुडवून खाल्ल्यासारखे वाटल्याने ते खाली वाकून नीट सगळं पाहतात. २०२२ सालचा फेब्रुवारी महिना सुरू होता. हवेत गारवा असला तरी वातावरण चांगलं होतं. सूर्य वर आला होता आणि त्याची ऊब जाणवत होती.
“हा एक प्रकारचा दुष्काळच आहे,” ते तुटकपणे म्हणतात.
या एका वाक्यात ४८ वर्षीय तराळेंचा वैताग आणि मनातली भीती समजून येते. तीन महिने राबल्यानंतर आपल्या पाच एकरात उभी असलेली तूर आणि मुगाचं पीक हातचं जाणार का याचा त्यांना घोर लागून राहिला आहे. गेली २५ वर्षं ते शेती करतायत. आणि इतक्या वर्षांत त्यांनी अनेक प्रकारचे दुष्काळ अनुभवले आहेत – पावसाशी संबंधित म्हणजेच कोरडा किंवा ओला दुष्काळ, पाण्याशी संबंधित, जेव्हा भूगर्भातल्या पाण्याची पातळी झपाट्याने खालावते आणि शेतीशी संबंधित, जेव्हा जमिनीत ओलच नसल्यामुळे पीक वाया जातं.
चांगलं पीक हाती येणार असं वाटत असतानाच हे संकट येतं आणि डोळ्यासमोर होत्याचं नव्हतं होतं, तराळे सांगतात. आणि संकट कधी चार पायावर येतं, कधी उडत तर कधी पिकं भुईसपाट करून जातं.
“पाणकोंबड्या, माकडं, ससे दिवसा येतात. हरणं, नीलगायी, सांबर, रानडुकरं आणि वाघ रात्री,” कोणाकोणापासून शेतीला धोका आहे त्याची यादीच ते देतात.
“आम्हाला पेरता येते साहेब, पण वाचवता येत नाही,” ते अगदी हताश स्वरात सांगतात. कपास आणि सोयाबीन या नगदी पिकांसोबतच ते मूग, मका, ज्वारी आणि तूर घेतात.




















