उजव्या हातात तलवार, डाव्या हातात घोड्याचा लगाम घेतलेली रणरागिणी राणी वेल नचियार. प्रजासत्ताक दिनी चेन्नईत निघालेल्या चित्ररथाच्या परेडमधल्या या ऐतिहासिक योद्ध्यांच्या पुतळ्यांपैकी सर्वात जास्त फोटो काढले जात होते तिच्याच पुतळ्याचे आणि चर्चाही तिचीच होत होती.
स्वातंत्र्य संग्रामात तमिळ नाडूचे योगदान दाखवणारा याच चित्ररथाला केंद्र सरकारच्या ‘तज्ज्ञ’ समितीने २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभाग नाकारला होता. राज्याचे मुख्यमंत्री, एम के स्टालिन यांनी पंतप्रधान मोदींना यामध्ये लक्ष घालण्याची विनंती करूनही काही फायदा झाला नाही. त्यानंतर चेन्नईमध्ये साजऱ्या झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये हा चित्ररथ दिमाखात फिरला.
केंद्राच्या या ‘तज्ज्ञ’ समितीचं म्हणणं होतं की चित्ररथावरील काही व्यक्ती “देशभरातल्या लोकांच्या माहितीच्या नाहीत” आणखीही बरंच काही. अक्षया कृष्णमूर्तीला मात्र हे बिलकुल पटलेलं नाही. त्यातल्या एका व्यक्तीशी, वेल नचियारशी आपलं काही तरी नातं असल्यासारखं तिला वाटतं. याच वेल नचियारने इंग्रजांशी लढा दिला आणि आपल्या मृत्यूपर्यंत, १७९६ सालापर्यंत तमिळ नाडूमधल्या सिवगंगैवर राज्य केलं.
“अकरावीत असताना मी आमच्या शाळेत एका नाचाच्या कार्यक्रमात वेल नचियारची मुख्य भूमिका केली होती. तेव्हापासून माझं आयुष्यच बदलून गेलं,” ती सांगते.
“आणि ते काही फक्त नाच आणि गाणं इतक्यापुरतं नव्हतं,” अक्षया पुढे सांगते. त्या गाण्यातून, गाण्याच्या शब्दांतून तिला ‘वीरमांगई’चं धैर्य आणि शक्ती जाणवल्याचं अक्षया सांगते. राणीला वेल नचियारला प्रेमाने लोक वीरमांगई म्हणतात. अक्षयाने नृत्याचं शास्त्रीय शिक्षण घेतलं आहे. तिला आठवतं की आंतरशालेय नृत्य स्पर्धेच्या दिवशी तिची तब्येत ठीक नव्हती. आपल्याला नीट सगळं जमेल का याची शंकाच वाटत होती पण तिने सगळी ताकद गोळा करून सर्वोत्तम सादर करायचा प्रयत्न केला.
रंगमंचावरून ती खाली उतरली आणि तिला घेरी आली. तिला तडक हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि तिथे सलाइन लावण्यात आलं. “आमचा दुसरा क्रमांक आला. मी पुरस्कार स्वीकारला तेव्हाही माझ्या हाताला सलाईनची नळी लावलेली होती.” आपल्यातल्या शक्तीवर विश्वास ठेवण्याचा धडा ती त्या दिवशी शिकली. ती “अधिक धाडसी बनली,” मोटरसायकल आणि कारही चालवायला शिकली.












