माया मोहिते तीन महिन्यांच्या शीतलची देखभाल करत आहे. बाळाची आई, पूजा, त्यांच्या खोपीपासून काही अंतरावर कामावर गेलीये. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातले कापड आणि ताडपत्रीच्या दोन खोपी हीच त्यांची घरं. माया एका खडकावर बसून, उद्यानातल्या एका झऱ्याच्या पाण्यात भांडी घासतीये . बाळ पाळण्यात झोपी गेलंय - पाळणा म्हणजे लाल पांघरूण घाललेलं एक जुनं सिमेंटचं पोतं.
"इथे एका कार पार्किंगचं बांधकाम सुरु आहे," माया सांगते. मुंबईतल्या बोरिवली (पूर्व) मधल्या राष्ट्रीय उद्यानाच्या प्रवेशापाशी पार्किंगचं बांधकाम सुरू आहे. डिसेंबर २०१८ मध्ये माया आपल्या कुटुंबातील सात जणांसोबत इथे आली, त्यातलीच एक म्हणजे पूजा, तिची नणंद. कुटुंबातले काही जण मुंबईहून सुमारे ७० किमी दूर खोपोलीतल्या एका बांधकामाच्या साइटवरून इथे आले, आणि काही जण राजस्थानातलं काम उरकून बोरिवलीत पोचलेत.
दरवर्षी पावसाळ्यात मोहिते कुटुंबीय आपल्या गावी, जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील हर्पाळ्याला परततात. हे कुटुंब बेलदार जमातीचं आहे. (काही राज्यांमध्ये यांची नोंद भटक्या जमातीत होते). मायाचे पालक आणि त्यांची तीन भावंडंसुद्धा शेतमजूर आहेत. "माझं लग्न झालं तेव्हा मी फार लहान होते. तेव्हा मी शेतात कामं करायची," आता २५ वर्षांची असणारी माया सांगते.
गेली बरीच वर्षं मायाच्या सासू-सासऱ्यांनी मुंबई आणि महाराष्ट्रातल्या इतर भागात बांधकामावर काम केलं. "मग त्यांनी गावात एक एकर जमीन घेतली अन् ते परत आले," मुकेश मोहिते, मायाचा दीर सांगतो. काही वर्षं त्यांनी शेतमजुरी करून पाहिली; पण मजुरी रु. १५०-२०० च्या वर वाढेचना. मग त्यांनी परत बांधकामावर कामं करायचं ठरवलं, जिथे रोजगार रु. ४००-५०० पर्यंत मिळू शकतो, मुकेश सांगतो.







