हत्तीच्या पायांचे ठसे मिळतात का ते पाहण्यासाठी आम्ही डोंगरात हिंडत होतो.
आणि तिथे मऊ मातीत आम्हाला अगदी ताटांहूनही मोठ्या आकाराचे अनेक ठसे सापडू लागतात. काही दिवसांपूर्वीच्या ठशांची माती आता गळून पडायला लागलीये. आणि बाकीच्या ठशांवरून हत्तीने इथे काय काय उद्योग केलेत ते समजून येतंयः थोडीफार भटकंती, भरपेट जेवण आणि भरपूर लीद. आणि जाता जाता दिलेल्या धक्क्यांच्या खुणा सर्वत्रः ग्रॅनाइटचे खांब, कुंपणाच्या तारा, फाटकं...
हत्तीसंबंधी जे जे काही सापडेल ते आम्ही कॅमेऱ्यात टिपत होतो. पायाच्या ठशाचा एक फोटो मी माझ्या संपादकाला पाठवला. “या ठशाचा मालक हत्ती होता का आसपास?” फार आतुरतेने तो विचारतो. पण मी मात्र त्याच्या मनातली आशा खरी न ठरो असा धावा केला.
कारण कसंय, कृष्णगिरीच्या गंगनहळ्ळी पाड्यावरचे हत्ती काही सोंडेने डोक्यावर थोपटणारे आणि केळी मागणारे गोंडस हत्ती नाहीत. देवळातल्या हत्तींना कदाचित असं काही आवडत असेल. पण त्यांचे जंगलात राहणारे हे भाऊ मात्र वन्य आहेत आणि कायम भुकेले.
तमिळ नाडूच्या कृष्णगिरी जिल्ह्यातल्या नाचणीच्या शेतकऱ्यांना मी २०२१ च्या डिसेंबरमध्ये भेटायला गेले आणि माझ्याही नकळत माझे पाय या हत्तींच्या मागावर पडले. मला वाटत होतं की शेतीचं अर्थकारण वगैरे विषयांवर चर्चा होईल. पण ज्यांच्या ज्यांच्याशी बोलले त्या सगळ्यांचं म्हणणं एकच. आता केवळ घरच्यापुरती नाचणी पिकतीये आणि याला कारणीभूत कोण, तर हत्ती. तुटपंजा भाव (किलोमागे २५-२७ रुपये. जर ३५-३७ रुपये भाव मिळाला तर त्यांचं किमान नुकसान तर होणार नाही), वातावरणातले बदल आणि प्रचंड प्रमाणातला पाऊस यामुळे शेतकरी कात्रीत सापडला आहे. आणि ‘घरचं झालं थोडं आणि व्याह्यानं धाडलं घोडं’ म्हणावं तसं हत्ती आता पिकात घुसतायत आणि शेतकऱ्याचं कंबरडं पारच मोडून चाललंय.
“हत्ती हा फार बुद्धीमान प्राणी आहे. कुंपणाच्या तारा पायाने खाली कशा वाकवायच्या आणि मग कुंपण पार कसं करायचं त्याचा शोध त्याने आता लावलाय. आणि विजेचा प्रवाह असलेल्या ताऱांच्या कुंपणासाठी झाडाच्या फांद्यांचा वापर कसा करायचा, तेही,” आनंदरामू रेड्डी सांगतात. “आणि ते कायम कळपात हिंडत असतात.” देनकनीकोट्टई तालुक्यातल्या वदरा पालयम पाड्यावरच्या आनंदरामूंना सगळे प्रेमाने आनंदा म्हणतात. मेलगिरी राखीव जंगलाच्या वेशीवर ते आमच्याशी बोलत होते. हे जंगल कावेरी उत्तर वन्यजीव अभयारण्याच्या क्षेत्रात मोडतं.


















