दिल्लीच्या लाल कुआँ भागातल्या पुल पेलाद मोहल्ल्यात सगळ्यांनाच तो ‘गाडी लावणारा’ किंवा ‘मिर्ची-आलू’ पोरगा माहितीये. या भागातला तो सगळ्यात लहान हातगाडीवाला आहे.
तो वस्तीतल्या अरुंद बोळातून नाल्यांच्या कडेने एका खुल्या जागेकडे पळत जाताना मी त्याला पाहिलं, तिथे तो त्याची हातगाडी लावतो. गल्लीच्या तोंडाशी त्याने त्याची हातगाडी आणली, ती एका जागी पक्की रहावी म्हणून चाकाला टेकू म्हणून दगड लावले आणि तो एका खोलीत गायब झाला. १४ वर्षांच्या अर्जुन सिंगसाठी हे रोजचंच आहे. तो आता आपल्या गाडीवर बटाट्याचे वेफर्स आणि मोमो विकायला ठेवेल.
हा लाजरा पण हसरा मुलगा त्याच्या विधवा आईबरोबर, लक्ष्मी सिंगबरोबर एका लहान खोलीत राहतो. त्यांच्या या लहानशा घरात कसलंही फर्निचर नाही. भिंतीवर एक आरसा आहे आणि त्यावर कोपऱ्यात चिकटपट्टीचं एक छानसं हृदय चिकटवलंय. आणि त्यावर लिहिलंय, ‘लक्ष्मी+अर्जुन’. “मी लिहिलंय ते,” अर्जुन सांगतो, “म्हणजे मग जो कुणी आम्हाला भेटायला येईल त्यांना त्याच्यात आमची दुनिया पहायला मिळेल.”
त्याची ही दुनिया एकाकी आणि अवघड आहे.
१४ जुलै २०१३ रोजी अर्जुनचे वडील राजेश्वर सिंग इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रातलं गटार साफ करताना मरण पावले. ते तिथे २०११ पासून कामावर होते. त्याच्यासोबत अजून दोघे होते, त्यांच्या नाकात विषारी वायू गेला आणि त्यातच ते इमारतीच्या तळघरात मरण पावले. तो आणि इतर दोघं, अशोक कुमार आणि सतीश सिंग, या शासन संचलित कला केंद्रातले कंत्राटी कामगार. तिघंही जण वाल्मिकी या दलित समुदायातले, तिघांची घरं त्रिलोकपुरीतल्या वाल्मिकी वस्तीत. (लक्ष्मी त्यानंतर अर्जुनसोबत तिची विवाहित मुलगी राहते तिथे लाल कुआँमध्ये रहायला गेली.)




