१६ जून २०२२ ची रात्र होती. आसामच्या नागाव गावात लोबो दास आणि इतरही अनेक जण
नानोई नदीच्या तीरावर लगबगीने रेतीच्या गोण्या रचत होते. ४८ तास आधी त्यांना
कळवण्यात आलं होतं की ब्रह्मपुत्राची उपनदी असणारी नानोई पात्र सोडून वाहणार आहे.
नदीच्या तीरावरच्या दर्रांग जिल्ह्यातल्या या रहिवाशांना जिल्हा प्रशासनाकडून या
गोण्या पुरवण्यात आल्या होत्या.
“[जून १७ रोजी] मध्यरात्री १ च्या सुमारास बांध फुटला,” लोबो सांगतात. सिपाझार तालुक्यातल्या नागावच्या हिरा सुबुरी पाड्यावर ते राहतात. “आम्ही काहीच करू शकलो नाही. बांध वेगवेगळ्या ठिकाणी फुटायला लागला.” सलग पाच दिवस पावसाची झड लागलेली होती. आणि खरं तर महिन्याच्या सुरुवातीपासूनच नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी राज्याला झोडपून काढलं होतं. भारतीय हवामान वेधशाळेने देखील रेड अलर्ट जाहीर केला होता. १६ ते १८ जूनच्या दरम्यान आसाम आणि मेघालयात ‘तीव्र मुसळधार पाऊस’ (दररोज तब्बल २४४.५ मिमी किंवा त्याहून जास्त) पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता.
१६ जून रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास नानोई नदी रोंरावत नागावच्या दक्षिणेला असलेल्या खासडिपिला गावाच्या कालितापारा पाड्यामध्ये घुसली. जयमती कालितांच्या कुटुंबाचं सगळं काही पुरात वाहून गेलं. “साधा चमचा देखील राहिलेला नाही,” त्या सांगतात. निवाऱ्यासाछी ताडपत्रीची खोप करून त्यावर पत्रा टाकला आहे. “आमचं घर, साठवलेलं धान्य, गुरांचा गोठा सगळं काही पाण्यासोबत वाहून गेलं,” त्या सांगतात.
आसाम राज्य आपत्ती निवारण व्यवस्थापन प्राधिकरणाच्या दैनंदिन पूर अहवालानुसार, १६ जून रोजी राज्यातल्या २८ जिल्ह्यांमधल्या १९ लाख लोकांना पुराचा फटका बसला. एकट्या दर्रांगमध्ये ३ लाख लोक पुराने बाधित आहेत. त्या दिवशी राज्यातल्या सगळ्यात जास्त नुकसान झालेल्या तीन जिल्ह्यांमध्ये दर्रांग आहे. नानोई तर पात्र सोडून वाहत होतीच पण राज्यातल्या इतर सहा नद्या – बेकी, मानस, पगलडिया, पुथीमारी, जिया-भराली आणि ब्रह्मपुत्र – धोक्याच्या पातळी रेषेच्या वर वाहत होत्या.
“आम्ही २००२, २००४ आणि २०१४ साली देखील पुराचा सामना केला आहे. पण या वेळी त्याचं रुप अगदी रौद्र होतं,” टंकेश्वर देका सांगतात. गुडघाभर पाण्यातून वाट काढत ते नागावपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या हातिमाराच्या सरकारी आरोग्य केंद्रावर पोचले होते. हा दवाखाना भेरुवादोन गाव या परिसरात आहे. एक पाळीव मांजर त्यांना चावली, त्यामुळे ते रेबीजवरची लस घ्यायला १८ जून रोजी दवाखान्यात गेले होते.
“ते मांजर उपाशी होतं,” टंकेश्वर सांगतात. “कुणास ठाऊक तिला भूक लागली होती किंवा ती पावसाच्या पाण्यामुळे घाबरून गेली होती. दोन दिवस तिला कुणीही खायला ठेवलेलं नव्हतं. [मालक तरी] काय करणार, सगळीकडे पाणीच पाणी होतं. स्वयंपाकघर, घर, अहो, अख्खं गाव पाण्याखाली होतं,” ते सांगतात.
झाडांच्या वाढलेल्या मुळ्या, वाळवी आणि उंदरांनी बांध आतून पोखरून टाकला होता असं टंकेश्वर सांगतात. “गेल्या दहा वर्षांत त्याची डागडुजी झाली नसेल,” ते म्हणतात. “भाताच्या खाचरांत २-३ फूट गाळ भरलाय. इथल्या लोकांचं पोट शेती आणि रोजंदारीवर अवलंबून आहे. आता घरच्याचं कसं भागवणार?” ते विचारतात.
लक्ष्यपती दास यांनाही हाच प्रश्न भेडसावतोय. त्यांच्या तीन बिघा (एकरभर) रानात चिखल साचलाय. “दोन कठ्यात [पाच कठा म्हणजे एक बिघा] भात उगवला होता तो अजूनही गाळात आहे,” ते चिंतातुर होऊन सांगतात. “आता भाताची लावणी कशी करणार?”
लक्ष्यपतींचा मुलगा आणि मुलगी नागावहून १५ किलोमीटरवर सिपाझार कॉलेजमध्ये शिकतात. “त्यांना कॉलेजला यायला जायला रोज २०० रुपये लागतात. आता त्या पैशाची कशी काय सोय करायची तेच समजत नाहीये. [पुराचं] पाणी ओसरायला लागलंय, पण पुन्हा भरलं तर? आम्ही खूप घाबरून गेलोय आणि चिंतेत आहोत,” ते म्हणतात. बांधाची दुरुस्ती लवकर होईल अशी त्यांना आशा आहे.
“पांढऱ्या भोपळ्याचा वेल आणि पपईचं झाड उखडून पडलं. मग काय आम्ही भोपळे आणि पपया गावात
लोकांना वाटून टाकल्या,” हिरा सुबुरीच्या सुमित्रा दास सांगतात. त्यांचं तळं देखील
पूर्णच उद्ध्वस्त झालंय. “मी तळ्यात २,५०० रुपयांचं माशाचं बी टाकलं होतं. आता
जमिनीच्या पातळीला आलंय तळं. एकही मोठा मासा राहिला नाहीये,” सुमित्रा यांचे पती
ललित चंद्रा म्हणतात. पुराच्या पाण्यात भिजल्याने सडायला लागलेला कांदा बटाटा
निवडायचं काम ते करतायत.
सुमित्रा आणि चंद्रा ‘बंधक’ पद्धतीने शेती करतात. म्हणजे बिनखर्ची चौथा हिस्सा शेताच्या मालकाला द्यायचा असतो. ते घरी खाण्यापुरती शेती करतात आणि ललित आसपासच्या शेतांमध्ये मजुरी देखील करतात. “आता पुढची दहा वर्षं तरी या जमिनी वाहितीखाली येत नाहीत,” सुमित्रा म्हणतात. घरच्या आठ शेरडांसाठी आणि बदकांसाठी चाऱ्याची सोय करणंही मोठं मुश्किलीचं काम झालं आहे.
आता या कुटुंबाची सगळी भिस्त त्यांच्या मुलाच्या, म्हणजेच लबकुश दास याच्या कमाईवर आहे. तो नागावपासून आठ किलोमीटरवर असलेल्या नामखोला आणि लोथापारा या दोन गावी किराणा आणि कांदा-बटाटा व इतर भाज्या विकतो.
इतक्या सगळ्या नुकसानीत आणि संकटकाळात एक आनंदाची बातमी आली. २७ जून रोजी सुमित्रा आणि ललित यांच्या मुलीचा बारावीचा निकाल लागला आणि ती पहिल्या श्रेणीत पास झाल्याचं समजलं. तिची पुढे शिकण्याची इच्छा असली तरी सध्याची आर्थिक स्थिती पाहता तिच्या आईसमोर मोठं प्रश्नचिन्ह आहे.
अंकिताप्रमाणे, १८ वर्षांची जुबली देकालासुद्धा पुढचं शिक्षण घ्यायचंय. नागावहून तीन किलोमीटरवर दिपिला चौकातल्या एनआरडीएस कनिष्ठ महाविद्यालयात शिकणाऱ्या जुबलीला या परीक्षेत ७५ टक्के मिळाले आहेत. सभोवतालचं नुकसान पाहून तीही शिक्षणाबद्दल साशंकच आहे.
“मला काही निवारा शिबिरात रहायला आवडत नाही, म्हणून मी परत इथे आलीये,” ती म्हणते. नागावमध्ये पुराने पडझड केलेल्या आपल्या घराच्या खिडकीतूनच ती आमच्याशी बोलत होती. घरची बाकी चौघं जिल्हा प्रशासनाने उभारलेल्या निवारा शिबिरात आहेत. “त्या रात्री आम्हाला काय सोबत घ्यावं आणि काय नाही तेच सुधरलं नाही,” जुबली सांगते. घरात पुराचं पाणी भरलं तेव्हा जुबलीने आपली कॉलेजची बॅग तेवढी सोबत घेतली.
दहा दिवस सलग पाऊस सुरू होता. त्या काळात २३ वर्षीय दिपांकर दासला नागावमधली आपली चहाची टपरी सुरूच करता आली नाही. एरवी त्याची दिवसाला ३०० रुपयांची तरी कमाई होते. पण अतिवृष्टी होऊन गेल्यानंतर धंदा परत सुरू झालेला नाही. २३ जून रोजी आम्ही त्याला भेटलो तेव्हा त्याच्या दुकानातला एकमेव गिऱ्हाईक वाटीभर भिजवलेली मूगडाळ आणि सिगारेट घ्यायला आला होता.
दिपांकरच्या कुटुंबाची स्वतःची जमीन नाही. त्याचे वडील सतराम दास अधून मधून मजुरीला जातात. त्यांना मिळणारा रोज आणि चहाच्या दुकानातून जी काही कमाई होईल त्यावरच त्यांचं घर चालतं. “अजूनही आमच्या घरी गुडघाभर चिखल भरलाय, राहणंच शक्य नाही,” दिपांकर सांगतो. घराची इतकी पडझड झालीये की आता डागडुजी करायची तर लाखभराचा तरी खर्च येईल.
“सरकारने पूर येण्याआधी काही पावलं उचलली असती तर ही आपत्ती टाळता आली असती,” दिपांकर म्हणतो. तो पूर्वी गुवाहाटीत एका प्रसिद्ध बेकरीत काम करायचा. कोविडच्या टाळेबंदीदरम्यान तो नागावला परत आला. “बांध अगदी फुटण्याची वेळ आली, तेव्हा (जिल्हा प्रशासन) येऊन काय उपयोग? पाऊस नसताना त्यांनी पहायला पाहिजे, ना.”
आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माहितीनुसार १६ जून रोजी आलेल्या पावसाचा फटका २८ जिल्ह्यातल्या तब्बल १९ लाख लोकांना बसला
दिलिप कुमार देका पब्लिक सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागात खलासी किंवा चपरासी म्हणून काम करतात. ज्या गावांमध्ये नव्याने कूपनलिका बसवायला लागणार आहेत अशा गावांची यादी दाखवतात. पूरनिवारण कामाचा भाग म्हणून हा उपक्रम हाती घेतला जातो. पूर येऊन गेल्यानंतर थोड्या उंच भागात ट्यूबवेल बांधल्यावर लोकांना पिण्याचं पाणी मिळू शकतं.
पूर येऊन जाईपर्यंत त्यांचा विभाग का थांबला होता असं विचारताच ते सरळ म्हणाले, “आम्ही केवळ वरून आलेल्या आदेशाची अंलबजावणी करतो.” दर्रांग जिल्ह्यातल्या ब्यासपारामधे दिलिप यांचं घर आहे. तेही पाण्याखाली गेलं होतं. जून महिन्यात एरवी पडतो त्यापेक्षा ७९ टक्के जास्त पाऊस केवळ २२ दिवसांत पडला आहे.
“काल [२२ जून] प्रशासनाने पाण्याची पाकिटं वाटली पण आज आमच्याकडे पिण्याचं थेंबभरही पाणी नाहीये,” जयमती सांगतात. त्यांचे पती आणि मुलगा दोघंही रेबीजविरोधी लस घ्यायला गेले आहेत. दोघांनाही कुत्रा चावला आहे.
आम्ही नागावहून निघालो तेव्हा ललित चंद्रा आणि सुमित्रा पुराने घराची पडझड झालेली असतानाही आम्हाला निरोप द्यायला आले होते. ते म्हणाले, “लोक येतात, मदतीची पाकिटं देतात. पण कुणीही आमच्यासोबत बसत नाही, आमच्याशी बोलत नाही.”
अनुवाद: मेधा काळे