दर चार वर्षांनी गोंड आदिवासी सेमारगावला येतात. छत्तीसगडच्या कांकेर (उत्तर बस्तर) जिल्ह्यातल्या अंतागड तहसिलातलं २०० लोकसंख्या असणारं हे एक गाव. आपल्या पूर्वजांचं स्मरणं करण्यासाठी शेजारच्या कोंडागाव आणि नारायणपूरमधनं लोक इथल्या जत्रेत सामील होतात. गोंड आदिवासींचा अशी श्रद्धा आहे की त्यांचे पूर्वज वारल्यानंतरही आजही त्यांचं अस्तित्व आहे, जत्रेला येणाऱ्या या पूर्वजांची देव आणि देवता म्हणून पूजा केली जाते. मार्च २०१८ मध्ये मीदेखील या जत्रेत सामील झालो.
या जत्रेला म्हणतात, पहांदी पारी कुपार लिंगो कर्रसाड जत्रा. तीन दिवसांच्या या जत्रेत या देवाच्या ठाण्याला २०,००० हून जास्त लोक येतात. गोंड मिथकांमधल्या पारी कुपार लिंगो या म्हातारबाबाची इथे पूजा केली जाते. हा असा देव आहे ज्याच्यापासून या समुदायाच्या अनेक सांस्कृतिक आणि संगीताच्या परंपरा निर्माण झाल्या आहेत ज्यातून या देवांना त्यांची ओळख प्राप्त झाली आहे.
“पूर्वी ही जत्रा दर १२ वर्षांनी भरायची, मग दर ९ वर्षांनी आणि मग दर सात वर्षांनी जत्रा भरू लागली. आणि आता दर चार वर्षांनी ही जत्रा भरते,” या जत्रेचे एक आयोजक असलेले कोंडागाव जिल्ह्यातल्या खालेमुरबेंड गावातले गोंड आदिवासी असणारे बिष्णुदेव पांडा सांगतात. “पूर्वी लोक कमी असायचे, त्यामुळे साध्या पद्धतीनेच जत्रा साजरी व्हायची, पण आता मात्र जत्रा दणक्यात पार पडते. या जत्रेबद्दल वाचून किंवा ऐकून अनेक लोक इथे यायला लागलेत,” ते सांगतात. मोबाइल फोनमुळे आणि इथे यायला जायला दुचाकी गाड्या आणि टमटम मिळत असल्यामुळे ही जत्रा आता जास्त लोकप्रिय होऊ लागली आहे.
या जत्रेत लोक नेमके करतात काय असं जेव्हा मी बिष्णुदेव यांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं, “कोया जमातीच्या एकूण ७५० गोत्रांपैकी सुमारे ७२ गोत्रं इथे बस्तरमध्ये आहेत [इथल्या आदिवासींना इथे कोया संबोधतात पण गोंड, मुरिया आणि कोया हे अनुक्रमे बस्तर, तेलंगण आणि आंध्र प्रदेशमधले एकाच जमातीचे लोक आहेत]. या गोतातले लोक त्यांचे मंडकु पेन [दैवतं] सोबत घेऊन इथे येतात आणि एकमेकांच्या भेटी घेतात.” (प्रत्येत गोत्राचं एक देवक असतं – वेगवेगळ्या जीवांचं किंवा प्राण्यांचं प्रतीक, उदा. बोकड, वाघ, साप किंवा कासव. गोंड आदिवासी या देवकांची पूजा करतात आणि त्या प्रजातीचं संरक्षणही करतात.)
मग हे पेन नक्की कोण आहेत? एका सामाजिक संस्थेसोबत कांकेर शहरात काम करणारे केशव सोरी हे गोंड जमातीचे कार्यकर्ते सांगतात, “हे पेन म्हणजे आमचे पूर्वज आहेत. आमच्यासाठी आमचे वारलेले पूर्वज स्वर्गवासी होत नाहीत, ते पेन होतात. आमची अशी श्रद्धा आहे की आजही ते आमच्यात आहेत आणि म्हणून आम्ही त्यांची पूजा करतो. आम्ही आमच्या नातेवाइकांच्या मित्रमंडळींचे जे पेन आहेत त्यांनाही भेटायला जातो. सगळे गोंड त्यांचे पेन घेऊन जमतात आणि सगळे एकमेकांशी गप्पा मारतात, सण साजरा करतात.”
असं मानलं जातं की हे पेन म्हणजेच पूर्वज देव देवता या जत्रेत नाचतात, गातात, रडतात आणि एकमेकांची गळाभेट घेतात. लोक त्यांच्या अडचणी घेऊन त्यांच्याकडे येतात आणि ते त्यावर उपाय सांगतात. काही आदिवासी त्यांना झेंडूच्या माळा घालतात आणि मला कुणी तरी सांगितलं की या पूर्वजांना फुलं खूप आवडतात – जत्रेत विक्रीसाठी उदंड फुलं होती.
कांकेर जिल्ह्याच्या घोतिया गावचे पुजारी, देवसिंग कुरेती सांगतात, “आम्ही आंगा (देवता) सोबत घेऊन येतो आणि लिंगो डोकराची प्रार्थना करतो. [म्हाताऱ्या माणसासाठी लाडाने ही संज्ञा वापरली जाते, यालाच देवही म्हणतात]. आम्ही त्याला फुलं, सुपारी, कुंकू आणि लिंबू वाहतो. आम्ही डुकराचा आणि बकऱ्याचा बळी चढवतो.” वर्षानुवर्षं लोक या जत्रेला लांबून येतायत. रात्रभर पायी चालत, त्यांचे आंगा लाकडाच्या पालखीत ठेवून, सोबत फुलं, कोंबड्या आणि बकरी घेऊन लोक येतात. या वर्षी मी काही लोक वाहनांमधून आंगा घेऊन येताना पाहिले – हे काही तरी नवीन दिसतंय, केशव सोरी म्हणाले. त्यांच्यासोबतच मी या जत्रेत सामील झालो होतो.
मी याबद्दल सरकारी नोकरीत असणाऱ्या ५० वर्षीय जे आर मंडावी यांना विचारलं. ते त्यांचा आंगा बोलेरोतून घेऊन आले होते. ते म्हणतात, “मी जरी घोडागावहून आलो असलो तरी आमचा देव कांकेर जिल्ह्याच्या तेलावत गावात आहे. पूर्वी आम्ही आमच्या खांद्यावर आमचा आंगा घेऊन पायी जात असू. मात्र आता आमच्या कुटुंबात माणसं कमी आहेत. त्यामुळे एवढं अंतर [८० किमी] पायी जाणं अवघड झालंय. म्हणून मग आम्ही आमच्या आंगाची परवानगी घेतली. आणि जेव्हा आंगा उदुम कुमारीने [सगळे आंगा लिंगो देवाच्या नात्यातले असतात] आम्हाला परवानगी दिली तेव्हाच आम्ही तिला या गाडीतून इथे घेऊन आलोय.”
कांकेर जिल्ह्याच्या डोमाहारा गावातल्या मैतुराम कुरेती यांनी आपल्या अंगाला खांद्यावर वाहून आणलंय. ते सांगतात, “हे आमच्या पूर्वजांचं ठाणं आहे. आम्ही एका म्हाताऱ्या आईला सोबत आणलंय, ती लिंगो देवाची नातेवाइक आहे. आमची ही आई तिला जिथनं आवतन येईल तिथे [इतर देवतांना भेटायला] जाते आणि त्यांनादेखील तिला भेटायला येण्याचं आवतन देते.”
त्यांची श्रद्धा असणाऱ्या लिंगो देवाचा वास असणाऱ्या पवित्र ठाण्याला जायच्या आधी ही सगळी कुटुंबं झाडाखाली विसावा घेतात. चुलीवर भात, भाज्या, कोंबड्याचं मटण शिजवतात आणि नाचणीची पेज पितात. त्यांच्यातलेच एक म्हणजे कांकेर जिल्ह्यातल्या कोलियारी गावचे घस्सू मंडावी. ते सांगतात, “आम्ही मूड डोकराला इथे घेऊन आलोय, लिंगो देवाचा थोरला भाऊ आहे तो. त्यांचा धाकटा भाऊ, त्याची पोरं पोरी देखील आहेत इथे. ही फार जुनी परंपरा आहे आणि लिंगो डोकराचे सगळे कुटुंबीय इथे एकमेकाला भेटण्यासाठी जमलेत.”
या जत्रेच्या मैदानात फोटो काढायला आणि चित्रण करायला परवानगी नाही. गेल्या काही काळात गोंड संस्कृती आणि परंपरांचा, खास करून दृश्य माध्यमातून विपर्यास केला गेल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे आता लोक जास्त सतर्क झाले आहेत. त्यामुळे मी देखील त्यांच्या पवित्र ठाण्याबाहेरचे फोटो घेण्याची खबरदारी घेतली आहे.
अनुवादः मेधा काळे