“औषधं संपलीयेत, पैसे संपलेत आणि आता गॅसही संपलाय,” एप्रिलच्या मध्यावर सुरेश बहादुरने मला सांगितलं होतं.
गेल्या चार वर्षांपासून शिट्टी आणि लाठी घेऊन सुरेश रात्रभर सायकलवरून गस्त घालत घरं आणि दुकानांची राखण करत होता. तो आणि त्याचे वडील, राम बहादुर आंध्र प्रदेशच्या गोदावरी जिल्ह्यातल्या भीमावरमच्या वसाहतींमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करायचे.
२२ मार्चनंतर, जेव्हा टाळेबंदी सुरू झाली, त्याच्या सायकलला कुलुप लागलं, आणि सुरेशचा सगळा वेळ फोनवर कोविड-१९ च्या बातम्या पाहण्यात, खाणं, गॅस आणि पाणी आणण्यात जाऊ लागला.
२३ वर्षीय सुरेश तम्मी राजू नगर वसाहतीत एका भाड्याच्या खोलीत राहत होता. त्याच्या सोबत शुभम बहादुर, वय ४३ आणि २१ वर्षांचा राजेंद्र बहादुर राहायचे – तिघंही नेपाळच्या बझांग जिल्ह्यातल्या डिकला गावचे मित्र. टाळेबंदी सुरू झाली आणि लगेचच भीमावरममध्येच दुसरीकडे राहणारे राम बहादुर देखील त्यांच्यासोबत रहायला आले.
तोपर्यंत दर महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात राम आणि सुरेश घरटी १०-२० रुपये आणि दुकानांमधून ३०-४० रुपये गोळा करायचे. प्रत्येकाला ७,००० ते ९,००० रुपये मिळत होते. आता हे सगळं लोकांच्या मनावर असल्याने कधी कधी ही कमाई “५,००० रुपयांपर्यंत खाली देखील यायची,” राम बहादुर सांगतात. एप्रिल महिन्यात मी त्यांच्याशी बोलले तेव्हा ते म्हणाले. “आता ही कमाई थांबलीये.”






