“माझ्या मुलींचं आयुष्य असं नसावं,” विसालाच्ची सांगते. बोलता बोलता समोरच्या चमचमत्या मासळीच्या थरांमध्ये मीठ मिसळण्यासाठी ती खाली वाकते. ४३ वर्षांची विसालाच्ची गेली २० वर्षं तमिळ नाडूच्या किनाऱ्यावर असलेल्या कडलूर ओल्ड टाउन बंदरावर मासळी सुकवण्याचं काम करतीये.
“मी एका भूमीहीन दलित कुटुंबामध्ये लहानाची मोठी झालीये. माझे आई-वडील भातेशतीतले शेतमजूर होते. दोघांनी शिक्षण घेतलंच नव्हतं,” ती सांगते. वयाच्या १५ व्या वर्षी विसालाच्चीचं सक्तीवेलशी लग्न झालं. त्यानंतर दोनच वर्षांत कडलूर जिल्ह्यातल्या भीमराव नगरमध्ये त्यांची मुलगी शालिनी जन्मली.
भीमराव नगरमध्ये शेतीत काम मिळेनासं झाल्यामुळे विसालाच्ची कामाच्या शोधात कडलूर ओल्ड टाउन बंदरावर येऊन पोचली. तेव्हा तिचं वय होतं १७. आणि तेव्हाच तिची भेट कमलवेणीशी झाली. तिनेच मासळी सुकवायचा धंदा काय असतो, त्यातलं कौशल्य तिला शिकवलं. आणि त्यानंतर हे काम विसालाच्चीने आयुष्यभर केलं.
मासळी सुकवणं हा मासे साठवणीतला सगळ्यात जुना प्रकार आहे. यामध्ये खारवणे, स्मोक करणे आणि लोणचं घालणे अशा विविध प्रक्रियांचा समावेश होतो. कडलूर जिल्ह्यात ५,००० मच्छीमार स्त्रिया सध्या मासळीच्या धंद्यात आहेत. त्यातल्या १० टक्के मासळी सुकवणं, क्युअर करणं, मासळी सोलणं अशी कामं करत असल्याचं २०१६ साली झालेल्या सागरी मासे व्यवसाय जनगणनेतून दिसून आलं आहे. कोचीच्या केंद्रीय सागरी मासे व्यवसाय संशोधन संस्थेने ही गणना केली होती. मत्स्यव्यवसाय विभागानुसार २०२०-२१ साली तमिळ नाडूत मासे व्यवसायात कार्यरत असलेल्या स्त्रियांची संख्या २.६ लाख इतकी होती.

















