“सुंदरबनमध्ये आमच्यासाठी रोजचं जगणं म्हणजे संघर्षच असतो. सध्या कोरोनामुळे सगळंच तात्पुरतं बंद झालं असलं तरी आम्हाला माहितीये की आम्ही यातून तरून जाऊ. आमच्या रानांमध्ये बटाटा, कांदा, कारली, पडवळ आणि शेवगा आहे. साळीची कमी नाही. तळ्यांमध्ये चिक्कार मासे आहेत. त्यामुळे उपाशी मरण्याचा सवालच येत नाही,” मौसानीतून फोनवर सरल दास सांगतात.
देशभरातल्या टाळेबंदीमुळे देशभरातली अन्नधान्याची वितरणाची साखळी विस्कळित झाली असली तरी मौसानीत लोक बिनघोर आहेत – भारतात येणाऱ्या सुंदरबनच्या पश्चिमेकडे २४ चौरस किलोमीटर क्षेत्रावर या बेटाचा विस्तार आहे. “टाळेबंदीमुळे बेटांवरून रोज नामखाना किंवा काकद्वीपच्या बाजारात बोटी भरून जाणारा भाजीपाला आता पाठवता येत नाहीये,” दास सांगतात.
आपात्कालीन परिस्थितीसाठी ठेवण्यात आलेल्या काही ‘विशेष नौकां’मधून अजूनही मौसानीतून अनुक्रमे २० आणि ३० किलोमीटरवर असलेल्या नामखाना आणि काकद्वीपच्या ठोक बाजारांना भाजीपाल्याची जावक सुरू आहे. बोटीने या प्रवासाला ३० मिनिटं लागतात. पण तिथून हा माल कोलकात्याला नेणाऱ्या रेल्वेगाड्या आणि ट्रक मात्र सध्या सुरू नाहीत.
मौसानीची तीन प्रमुख पिकं आहेत – तांदूळ, कारलं आणि विड्याची पानं. कोलकात्याच्या बाजारात या तिन्हीला प्रचंड मागणी आहे. “त्यामुळे आता या वस्तू कशा येणार याचा शहराला घोर लागून राहिला आहे,” ५१ वर्षीय दास सांगतात. ते मौसानी बेटावरच्या बांगडांगा सहकारी शाळेत कारकून म्हणून काम करतात. त्यांची बागडांगा गावात पाच एकर जमीन आहे आणि ते ती भाड्याने कसायला देतात.
चारी बाजूंनी नद्या आणि समुद्राने वेढलेला सुंदरबनचा १०० हून अधिक बेटांचा हा समूह भारताच्या मुख्य भूमीपासून तुटल्यासारखाच आहे. मौसानीमध्ये मुरीगंगा (हिलाच बाराताला देखील म्हणतात) पश्चिमवाहिनी आहे तर चिनई ही पूर्ववाहिनी. हे जलमार्ग बेटावरच्या बागडांगा, बलियारा, कुसुमतला आणि मौसानी या चार मौझांमधल्या (गावं) २२,००० लोकांना बोटी आणि लॉंचद्वारे मुख्य भूमीशी जोडतात.
साउथ २४ परगणा जिल्ह्याच्या नामखाना तालुक्यातल्या या बेटावरचे लोक सध्या बऱ्यापैकी घरांमधेच राहतायत. बाग़डांगाच्या बाजारापाशी आठवड्यातून दोन दिवस, सोमवार आणि शुक्रवारी भरणाऱ्या बाजारात त्यांचं जाणं बंद झालंय. स्थानिक प्रशासनाने अत्यावश्यक वस्तू मिळत असल्याने रोज सकाळी ६ ते ९ बाजार भरवायला परवानगी दिलीये. बेटावरच्या अत्यावश्यक नसणाऱ्या वस्तूंच्या दुकानांना मात्र टाळं लागलं आहे. शेजारच्या फ्रेझरगंज बेटावरच्या फ्रेझरगंज किनारी पोलिस स्टेशनमधले हवालदार आणि काही स्वयंसेवक प्रशासनाला टाळेबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी मदत करत आहेत.
मौसानीच्या शेतांमध्ये पुरेशी पिकं उभी असल्याचं कुसुमताला गावातल्या ३२ वर्षीय जोयदेव मोंडलचंही म्हणणं आहे. “आम्ही आमच्या बाजारात ७-८ रुपये किलो भावाने पडवळ विकायला लागलोय. कोलकात्यात हीच भाजी तुम्ही ५० रुपये किलोने विकत घेता,” तो मला फोनवर सांगतो. या बेटावरच्या सगळ्या घरांमध्ये भाजी पिकवली जाते. त्यामुळे लोक भाजी क्वचितच विकत घेतात, मोंडल सांगतो. आमच्या इतर गरजेच्या गोष्टीच आम्ही विकत घेतो.
“आता बघा, माझ्याकडे २० किलो कांदा आणि चिक्कार बटाटा आहे. आमच्या तळ्यांमध्ये चिक्कार मासे आहेत. आता इथे खरेदी करायला कुणी नाही म्हणून बाजारात मासळी सडून चाललीये. थोड्याच दिवसात आमची सूर्यफुलाची पेरणी सुरू होईल. त्याचं तेल येईल,” मोंडल सांगतो. तो शिक्षक आहे आणि आपल्या मालकीच्या तीन एकर रानात कांदा, बटाटा आणि पानाची लागवड करतो.
पण मौसानीच्या दक्षिणेच्या किनाऱ्यावरच्या कुसुमताला आणि बलियारा गावांमध्ये मात्र मे २०१९ मधल्या आयला वादळाच्या प्रकोपानंतर शेती थांबल्यात जमा आहे. या वादळाने बेटाचा ३०-३५ टक्के भूभाग उद्ध्वस्त केला आणि जमिनीची क्षारताही वाढली. शेतीतलं उत्पादन घटल्यामुळे अनेक पुरुष घरं सोडून कामाच्या शोधात बाहेर पडले आहेत.
इथले लोक शक्यतो गुजरात किंवा केरळला मुख्यतः बांधकामावर कामासाठी स्थलांतर करून जातात. काही पश्चिम आशियातील देशांना जातात. “टाळेबंदीमुळे कमाई पूर्ण थांबली आहे. आता उद्या जाऊन त्यांच्या हाताचं कामच गेलं तर ते काय खाणार?” मोंडल याला प्रश्न पडलाय. त्याचं १२ वीपर्यंत शिक्षण पूर्ण झालंय आणि आता तो त्याच्या गावातल्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शिकवण्या घेतो.
गेल्या काही आठवड्यात अहमदाबाद, सुरत, मुंबई, पोर्ट ब्लेअर आणि इतर ठिकाणहून कामासाठी गेलेले लोक परत यायला लागले असल्याचं मोंडल सांगतो. बलियाराचे काही जण संयुक्त अरब अमिराती, कतार आणि ओमानमधल्या बांधकामांवर कामासाठी गेले होते, तेही घरी परतले आहेत, आणि बंगळुरूत नर्सिंगचं शिक्षण घेणाऱ्या काही तरुणीही.
सुंदरबनमध्ये समुद्राची पातळी गेल्या काही काळाच वाढत असल्यामुळे आणि खारं पाणी जमिनीत साठून राहत असल्यामुळे दक्षिणेकडच्या गावांमध्ये केवळ शेतीच नाही तर घरांवरही विपरित परिणाम व्हायला लागलाय. गरीब कुटुंबांमध्ये ५-१० लोक एका खोलीत राहतात. दिवसातला बराचसा काळ ते घराबाहेरच असतात, रस्त्यात, रानात, नद्या-नाल्यांमध्ये मासळी धरत. बरेच जणी रात्री बाहेरच झोपतात. आता टाळेबंदीच्या काळात त्यांना घरात बसून राहणं केवळ अशक्य आहे.
बेटावरच्या रहिवाशांना कोरोना विषाणूच्या संभाव्य धोक्याची चांगलीच कल्पना आहे. दास सांगतात की सध्या बेटावर एकदम कडक शिस्त पाळली जात आहे. गावी परतणाऱ्या कामगारांची माहिती स्थानिक प्रशासनाला देण्यात येत आहे आणि घरोघरी जाऊन शेजारी पाजारी त्यांची चौकशी करत आहेत. काकद्वीपच्या उपजिल्हा रुग्णालयातले डॉक्टर १४ दिवसांचं सक्तीचं विलगीकरण करण्याच्या सूचना देत आहेत आणि ते होतंय का नाही याच्यावर गावकऱ्यांची करडी नजर आहे. ज्यांनी दवाखान्यात जाणं टाळलं त्यांना तपासणीसाठी पाठवलं जात आहे.
दुबईहून परतलेल्या एका तरुणाला ताप आल्यामुळे कोलकात्याच्या बेलियाघाटा इथल्या आयडी अँड बीजी रुग्णालयात पाठवण्यात आलं. त्याला कोरोनाची लागण झाली नसल्याचं कळाल्यावर गावकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. रुग्णालयाने त्याला घरीच वेगळं राहण्याचा सल्ला दिला. संयुक्त अरब अमिरातीतून नुकतंच लग्न झालेलं एक जोडपं काही दिवसांपूर्वी परतलं होतं, तेही सध्या घरीच सर्वांपासून वेगळे राहत आहेत. कुणी नियम मोडले तर तालुका विकास अधिकारी आणि आरोग्य विभागाच्या प्रमुख वैद्यकीय अधिकाऱ्यांना लागलीच फोनवर कळवण्यात येत आहे.
बलियारा आणि कुसुमतालाच्या पुरुषांची कमाईच थांबली तर त्यांच्या घरच्यांकडचा अन्नाचा साठा लवकरच संपून जाईल. सध्या ही कुटुंबं सरकारतर्फे पुरवण्यात येणाऱ्या २ रु किलो तांदुळावर अवलंबून आहेत. सरकारने सप्टेंबरपर्यंत रेशनवर मोफत तांदूळ देण्याचं कबूल केलं आहे. कोविड-१९ चं संकट सरेपर्यंत महिन्याला पाच किलो तांदूळ देण्यात येणार आहे.
सरल दास यांना विश्वास वाटतो की मौसानीचे लोक हे संकट तरून जातील. “आम्ही सुंदरबनचे लोक मुख्य भूमीपासून तसे तुटलेले आहोत. आतापर्यंत इतक्या आपत्ती आणि संकटं आली आहेत आणि त्यात आम्हाला एक गोष्ट नक्की समजली आहे ती म्हणजे – संकट आलं तरी आपलं आपणच त्यातून तरून बाहेर यायचं असतं. आम्ही शक्यतो मदतीसाठी या मुख्यभूमीकडून आशा ठेवत नाही. कधी तरी मदत येतेच. कसंय, जसं मी माझ्या शेजाऱ्याला दोन पडवळ जास्त पाठवतो, तसं माझा शेजारी जादाच्या दोन काकड्या मला देईल याची मला खात्री असते. आम्ही सगळ्या संकटाचा सामना मिळून करतो, तसाच तो आताही करूच,” हसत ते सांगतात.
अनुवादः मेधा काळे