पुढे त्यांनी गायलेल्या काही व राधाबाई बोऱ्हाडेंसोबत एकत्र गायलेल्या काही ओव्या दिल्या आहेत. बाबासाहेबांच्या आयुष्यातल्या काही महत्त्वाच्या घटनांवर या ओव्या बांधल्या आहेत. १९९६ साली जेव्हा या ओव्या रेकॉर्ड केल्या, तेव्हा वाल्हाबाई आणि राधाबाई दोघी भीमनगरमध्ये राहत होत्या. (राधाबाई आता त्याच तालुक्यातल्या सावरगावला राहतात.)
माजलगावमधली भीमनगर ही प्रामुख्याने दलितांची वस्ती. ओवी प्रकल्पासाठी ही वस्ती म्हणजे बाबासाहेबांवरच्या ओव्यांचा जिवंत झरा. बाबासाहेब म्हणजे एक मुत्सद्दी राष्ट्रीय नेतृत्व, दलित आणि शोषितांचा आवाज जगापुढे मांडणारे कैवारी आणि भारताच्या संविधानाचे शिल्पकार. त्यांना वंदन करण्यासाठी १४ एप्रिलच्या त्यांच्या जयंतीचं निमित्त साधून या संपूर्ण महिन्यात पारी त्यांच्यावरच्या आणि जात व्यवस्थेवरच्या ओव्या प्रकाशित करत आहे.
पहिल्या रेकॉर्डिंगमध्ये वाल्हाबाई आणि राधाबाई सहा ओव्या गातात. पहिल्या ओवीत म्हटलंय की औरंगाबादच्या स्टेशनात बाबासाहेब पाणी पितायत. आणि तेही चांदीच्या घासणीने घासलेल्या सोन्याच्या पेल्यात. इतकी श्रीमंती आणि मान बाबासाहेबांनी शिक्षणामुळे मिळवलाय.
दुसऱ्या ओवीत काचेच्या ग्लासमध्ये जाई, शेवंतीची फुलं ठेवलीयेत, जी सौंदर्याचं प्रतीक आहेत. औरंगाबादला कॉलेजमध्ये बाबासाहेंबांना दृष्ट लागल्याचं सांगितलं आहे.
तिसऱ्या ओवीत आंबेडकरांच्या खिशाला असलेल्या सोनेरी पेनचा उल्लेख येतो. उच्च शिक्षित आणि विचारवंत, बुद्धीमान नेत्याचं प्रतीक म्हणून खिशाच्या पेनचा उल्लेख महत्त्वाचा आहे. त्यासोबतच साऱ्या देशाला जय भीम ही नवी घोषणा मिळाल्याचं या ओवीत म्हटलं आहे.
चौथ्या ओवीत भीमराज आले आणि गावोगावी प्रत्येक मूल शाळेत घाला असा नारा गेल्याचं म्हटलं आहे. छत्रीचा आणि छत्रीच्या फुलाचा यमक म्हणून वापर झाला असावा.
पाचव्या आणि सहाव्या ओवीमध्ये बाबासाहेब घरी आल्याचा आनंद व्यक्त केला आहे. जणू माझा भाऊ घरी आला आहे अशी भावना गाणाऱ्या बाईच्या मनात आहे. त्यामुळे त्यांचं स्वागत करण्यासाठी ती शेजारणीला दुधाचा पेला आणि साखरेची वाटी आणायला सांगते. ज्या गातायत त्यांची घरची परिस्थिती हलाखीची आहे, दूध-साखर अशा गोष्टी त्यांच्याकडे सहज उपलब्ध नसणार त्यामुळे शेजारणीला त्या आणायला सांगितल्या जातात असंही यातून प्रतीत होतं.
बाई सोन्याचा गिलास, ह्याला चांदीची घासणी
भीमराज पाणी प्याले, औरंगबादच्या गं ठेसणी
जाई शेवंतीचे फूल, काचंच्या गिलासात
भिमाला गं झाली दिष्ट, औरंगबादी गं कॉलीजात
बाई सोन्याचा गं पेन, भिमराजाच्या खिशला
भीमराजाच्या खिशला, झाला जयभिम गं देशला
आले आले भीमराज, याच्या छतरीला फूल
गावोगावी गेली हूल, साळामंदी गं घाला मूल
अग शेजारीणी बाई दूध कर पेला पेला
माझ्या घरला पाहुणा भीम माझा गं बंधू आला
अग शेजारीणीबाई साखर करा वाटी वाटी
साखर करा वाटी वाटी भीम आले गं भेटीसाठी