आसामवरचं वसाहतवाद आणि फाळणीचं सावट आजही फिटलं नाहीये. आणि विविध पद्धतीने ते आपल्याला जाणवतं. याचं सगळ्यात ढळढळीत उदाहरण म्हणजे नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स (एनआरसी) हा नागरिकत्व नोंदणीचा उपक्रम. यातून १९ लाख लोकांचं नागरिकत्व रद्द होण्याची मोठी भीती आहे. काही नागरिकांची ‘डाउटफुल (डी)-व्होटर’ किंवा ‘संशयित मतदार’ अशी वर्गवारी तयार करण्यात आली ते याचंच एक पाऊल. आणि फक्त वर्गवारी नाही तर अशा नागरिकांना डिटेन्शन किंवा स्थानबद्ध करून शिबिरांमध्ये टाकायला सुरुवात झाली आहे. १९९० चं दशक सरत होतं तेव्हापासून आसाममध्ये परदेशी नागरिकांसाठीचे अनेक लवाद स्थापन करण्यात आले. त्यानंतर डिसेंबर २०१९ मध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) पारित करण्यात आला. त्यानंतर राज्यात नागरिकत्वाचा मुद्दा पेटला आहे.
या सगळ्या गर्तेत अडकलेल्या सहा जणांच्या कहाण्या त्यांच्या स्वतःच्या तोंडून ऐकताना या सर्व अरिष्टाचे परिणाम लोकांच्या वैयक्तिक आयुष्यावर कसे होत आहेत ते तर समजतंच पण इतिहासावर याच्या अमिट खुणा राहणार हेही कळतं. नेली हत्याकांडावेळी आठ वर्षांच्या असलेल्या रशिदा बेगम यांचं नाव नागरिकत्व सूचीत नाही. त्यांच्या कुटुंबातल्या बाकी सगळ्यांचं नाव यादीत असूनही. शहाजहान अलीचं नावही यात नाही आणि सोबत त्याच्या घरच्या अनेकांची नावं सापडत नाहीत. सध्या तो आसाममध्ये नागरिकत्वाच्या मुद्द्याभोवती तो सध्या लोकांसोबत काम करत आहे.


