यंदाच्या मार्च महिन्यात एक दिवस भर दुपारी, तळपत्या उन्हात तीन हंडे पाणी घेऊन येणारी ममता रेंजड विहिरीकडून घराकडे जाणाऱ्या निर्मनुष्य वाटेवर भोवळ येऊन पडली. “मी रस्त्यावर मेल्यासारखी पडलेली कुणी पाहिली पण नाय,” ती सांगते. “वीस मिनिटानी मी शुद्धीवर आली तर सगळं पाणी सांडून गेलेलं. कशी तरी मी घरी पोचली आणि नवऱ्याला उठवलं. त्यानी नमक-साखर पाणी करून दिलं मला.”
या वर्षी गाळतऱ्याच्या इतर बायांप्रमाणे ममताला देखील जरा लवकरच तीन किलोमीटरवरच्या विहिरीची खडतर वाट धरावी लागली आहे. महाराष्ट्रातच्या पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यातल्या गाळतरे गावचे दोन्ही आड यंदा फेब्रुवारीतच पूर्ण कोरडे पडले आहेत. पूर्वी गावातल्या या आडांचं पाणी, जे पिण्यासाठी वापरलं जातं, मे महिन्याच्या सुरुवातीपर्यंत रहायचं असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे. त्यानंतर बायांना दूरच्या विहिरीवर जावं लागायचं जिच्यात थोडं तरी पाणी राहिलेलं असायचं. पण २०१९ साली काही महिने आधीपासूनच टंचाई जाणवायला लागलीये.
“दर उन्हाळ्यातच आम्हाला पाण्याची अडचण असते, पण यंदा कुठंच पाणी राहिलेलं नाही,” ४२ वर्षांच्या मनाली पडवळे सांगतात. त्यादेखील ममताप्रमाणे गावाजवळच्या एका देवस्थानात १५५ रुपये रोजाने सफाईचं काम करतात. त्यांचा नवरा तिथेच चालक आहे. “आम्हाला काही टँकरने पाणी येत नाही आणि तो विकत घेण्याची आमची ऐपत नाही,” त्या पुढे म्हणतात.
गावापासनं अर्ध्या किलोमीटरवर वाहणारी वैतरणा गाळतऱ्याच्या २,४७४ रहिवाशांसाठी (जनगणना, २०११) पाण्याचा मुख्य स्रोत आहे. गावात बहुतांश लोक मल्हार कोळी आणि वारली आदिवासी आहेत. या वर्षी मे उजाडला तोपर्यंत नदी म्हणजे नुसते दगड गोटे आणि घोटभर पाणी अशी गत होती. या आधीच्या उन्हाळ्यांमध्ये गाळतऱ्याचे लोकांच्या म्हणण्यानुसार वैतरणेत जास्त पाणी असायचं. “नदीत [सध्या] उरलेलं पाणी जनावरं धुण्यासाठी वापरलं जातं आणि पुढे तेच घाण पाणी गावातल्या नळांना येतं,” मनाली म्हणतात.












