जात्यावरच्या ओव्यांच्या या मालिकेत सविंदणे गावच्या धोंडाबाई आणि अंजनाबाई गाढवे दळण सरल्याच्या काही ओव्या गात आहेत. त्यांचे कष्ट वाटून घ्यायला त्यांचे देव-देवता येतात असं त्या गातात.
१२ व्या शतकातल्या भक्ती संप्रदायाच्या संत जनाबाईंचा पुतळा गाढवे कुटुंबियांच्या घराबाहेरच्या देवळीत उभा आहे. फकिरा गाढवेंनी त्यांच्या हयातीत हा पुतळा घडवलाय. ते जातीने आणि व्यवसायाने कुंभार. ते भांडी घडवायचे आणि त्यांच्या पत्नी धोंडाबाई गारा करायच्या, भांडी भाजायला राब करायच्या आणि भांडी तयार झाल्यावर ती नीट सांभाळून ठेवण्याचं कामही त्यांचंच. भांड्यांचं काम नसेल तेव्हा दोघंही शेतात मजुरी करत.
त्यांच्या पिढीच्या इतर स्त्रियांप्रमाणे धोंडाबाईदेखील घरीच दळणं करीत, कधी कधी सोबतीला त्यांची सून अंजनाबाई असायची. दोघी मिळून ओव्या गात असत, तेवढाच कष्टाचा भार हलका होई.







