मनजीत कौर गोठ्यातल्या म्हशीचा शेणाचा पो दोन्ही हातांनी उचलतात. उकिडव्या बसलेल्या मनजीत नुकतंच पडलेलं, अजूनही गरम असलेलं उरलंसुरलं शेण उचलून घेतात आणि बालट्यात टाकतात. नंतर बालटा डोक्यावर. तोल सांभाळत गोठ्याचं लाकडी फाटक पार करून ५० मीटरवरच्या शेणाच्या उकिरड्यावर त्या बालटा रिकामा करतात. गेल्या महिनाभरातल्या कामाचा पुरावा म्हणजे हा शेणाचा छातीपर्यंत येईल इतका मोठा ढीग.
एप्रिल महिन्याची दुपार आहे. रणरणतं ऊन आहे. अर्ध्या तासात मनजीत अशा आठ खेपा करतात. सगळं शेण काढल्यावर त्या हाताने बालटा धुऊन टाकतात. दिवसभराचं काम संपवून घरी जाण्याआधी त्या स्टीलच्या एका छोट्या डब्यात म्हशीचं अर्धा लिटर भरेल इतकंच दूध घेतात, आपल्या नातवासाठी.
सकाळी ७ वाजल्यापासून त्यांचं काम सुरू आहे. आणि हे सहावं घर आहे. सगळी जाट कुटुंबांची घरं. पंजाबच्या तरन तारन जिल्ह्याच्या हवेलियां गावात मुख्यतः जाटच जमीनदार आहेत.
“मजबुरी है,” त्या म्हणतात. पोटासाठी त्यांना ही अशी गुरांचा शेणघाण काढावी लागतीये. दिवसभरात त्या डोक्यावरून किती शेण वाहून नेतात, याची काही त्यांना कल्पना नाही. “बड्डा सिर दुखदा है, भार चुकदे चुकदे [इतका सगळा भार वाहून डोकं फार दुखतं].”
घरी जायच्या वाटेवर क्षितिजापर्यंत गव्हाची सोनरंगी शेतं डुलत असतात. गहू काढायलाच आलाय. बैसाखी झाली की लगेच. पंजाबातला हा सुगीचा सण. गंदीविंद तालुक्यातल्या हवेलियां गावातली बहुतेक शेतजमीन जाट शिखांच्या मालकीची असून त्यात प्रामुख्याने तांदूळ आणि गहू पिकतो.















