“काय गं, आज गाडीत बसायला जागा मिळेल का?” दक्षिण कोलकात्याच्या यादवपूर स्थानकातल्या गर्दीर्ने ओसंडून वाहणाऱ्या फलाटावरून ब्रेश्पती सरदार जोरात हाळी घालते. तिच्या पलिकडे उभ्या असलेल्या बाया नाराजीतच नकारार्थी मान डोलावतात. तिच्या प्रश्नाचं त्यांना हसू येतं.
ब्रेश्पती कॅनिंगला जाणाऱ्या ४.३५ वाजताच्या गाडीची वाटत पाहतीये. आणि गाडी वेगात यादवपूर स्थानकात येते. सगळ्या बाया गर्दीत ढकलाढकली करून, अगोदरच गच्च भरलेल्या महिलांसाठीच्या डब्यात शिरायची पुरेपूर तयारी करतात.
ही गाडी उत्तर कोलकात्याहून आलीये, वाटेत पार्क सर्कस, बालीगंज जंक्शन आणि ढाकुरियाचे थांबे तिने घेतलेत. यादवपूरनंतर आता ती बाघायतीन, न्यू गडिया आणि गडिया या स्थानकांवर थांबेल. दक्षिण कोलकात्यातल्या बहुतांशी मध्यम वर्गीय किंवा श्रीमंत असा भाग आहे हा. जादवपूर स्थानकात थांबलेल्या, आणि मार्गावरच्या इतरही थांब्यावरच्या या बाया दक्षिण कोलकात्यातल्या या वसाहतींमध्ये घरकामगार म्हणून काम करतात.
यातल्या बऱ्याच जणी सियाल्दा-कॅनिंग या ४५ किमीच्या, १६ थांबे असणाऱ्या मार्गावर किंवा सियाल्दा-लक्ष्मीकांतपूर या ६५ किमीच्या २५ थांबे असणाऱ्या मार्गावर किंवा सियाल्दा-नामखाना या दक्षिणेकडे अजून पुढे जाणाऱ्या मार्गावर प्रवास करतात. त्यामुळेच कोलकात्यातल्या काहींनी या पूर्व मार्गावरच्या गाड्यांना ‘झी’ स्पेशल असं नाव दिलंय. बंगाली भाषेत घरकामगारांसाठी तुच्छतेने ‘झी’ असा शब्द वापरला जातो.









