बाहेरामध्ये मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होतं आणि बरेच जण गाव सोडून बांधकामांवर मजूर म्हणून काम करू लागतात. साहू कुटुंबाचा गावी जमिनीचा एक लहानसा तुकडा आहे – एकराहूनही कमी. “आम्ही जर दुसऱ्यांच्या रानात काम केलं तर आम्हाला फक्त १०० रुपये रोज मिळतो,” नीरा सांगतात. त्यांनी त्यांची जमीन बटईने कसायला दिली आहे आणि बटईदार त्यांना वर्षाला १०-२० पोती तांदूळ किंवा गहू देतो. अर्थात कसं पिकतंय त्यावर हे अवलंबून असतं. जवळ जवळ चार वर्षं लखनौमध्ये काम केल्यानंतर आपल्या कमाईतून त्यांनी गावी तीन खोल्यांचं विटांचं बांधकाम केलं आहे. आता संडास बांधायचाय आणि मग सगळ्या खोल्यांना गिलावा करून घ्यायचं त्यांचं नियोजन आहे.
दिवसाकाठी साडेसात तास इतक मोलाचं काम केल्यानंतर संगीता आणि नीरा यांना प्रत्येकी ३५० रुपये रोजगार मिळतो – इतर मजुरांइतकाच. एकही सुट्टी नाही आणि जर त्यांनी खाडा केला तर पैसे कापले जातात. संगीताचे वडील सलिकराम याच ठिकाणी मिस्त्री म्हणून काम करतात. श्यामूला मजुराहून जास्त पण मिस्त्रीहून कमी, ४०० रुपये रोज मिळतो. आणि सगळ्यात धाकटी आरती जागामालकाकडे स्वयंपाकाचं काम करते आणि महिन्याला ६०० रुपयाची भर घालते. सगळ्यांच्या म्हणजे पाचही जणांच्या कमाईतून महिन्याला या कुटुंबाची १०,००० रुपयाची बचत होत असावी.
इथल्या बहुतेक बांधकामांवर स्त्रिया मजूर म्हणून काम करतात. ५० किलोची सिमेंटची पोती आणि कालवलेला माल पाठीवर, डोक्यावर वाहून नेण्याचं काम असतं त्यांचं. संगीताची थोरली बहीण संतोषी मात्र याला अपवाद ठरली. तिची तीक्ष्ण नजर आणि चिकाटी पाहून अन्सारुद्दिननी तिला भिंतींवरचे थर काढण्याचं प्रशिक्षण द्यायचं ठरवलं. “ती जवळ जवळ ७०% मिस्त्रीचंच काम करत होती. पण मग तिचं लग्न झालं,” ते सांगतात. संतोषी आता तिच्या नवऱ्याबरोबर पुण्यात साधी मजूर म्हणून काम करते, मिस्त्रीचं नाही जी ती बनू शकली असती.
संतोषीचं काम सुटल्यावर ती हानी भरून काढण्यासाठी अन्सारुद्दिनने सलिकरामला भिंतींचे थर खरवडण्याचं काम करण्याची गळ घातली. “म्हणजे मग जेव्हा केव्हा त्याला इमारतींच्या जीर्णोद्धाराची कामं मिळतील तेव्हा संगीताचं कौशल्य तरी चांगल्या पद्धतीने वापरलं जाईल.” ते असंही सांगतात की त्यांच्या २० वर्षांच्या कामात त्यांना आजपर्यंत संगीतासारखी उपजत जाण, कौशल्य असणारं कुणीही भेटलेलं नाही. पण सलिकरामने फारसा काही उत्साह दाखवलेला नाही. त्यामुळे संगीताला कल्पना नसली तरी तिच्या भविष्यात तिला ज्या संधी मिळू शकतात त्याला आळा बसला आहे.
संगीता तिच्या कामात कितीही कुशल असली तरी त्यामुळे तिला होणारा त्रास काही कमी होत नाही. “माझे डोळे आणि खांदे दुखतात. आणि बहुतेक वेळा माझा अवतार एखाद्या भुतासारखा असतो,” भिंतीच्या रंगाची आणि सिमेंटची बारीक धूळ तिचे कपडे माखून टाकते, त्याबद्दल ती सांगते. तिचा रोजचा दिवस सकाळी ६ वाजता सुरू होतो. सगळ्यात पहिलं काम म्हणजे मैदानात २० फुटावर असलेल्या हातपंपावरून १५-२० बादल्या पाणी भरून आणणं. त्यानंतर ती कपडे धुऊन टाकते आणि मग अंघोळ करते. तेवढ्या वेळात आरती नाश्ता आणि दुपारचे जेवण बनवते. कामाहून परतल्यावर ती परत ४-५ बादल्या पाणी भरते आणि मग रात्रीचा स्वयंपाक करते – नूडल्स, चिकन आणि मच्छी खायला तिला सगळ्यात जास्त आवडतं. घरचे पुरुष लागला तर किराणा आणायला घराबाहेर पडतात किंवा मग आराम करतात. श्यामू कधी काळी एका केटररबरोबर काम करत होता त्यामुळे तोही कधी-कधी त्याची पाककला दाखवतो आणि काही पदार्थ बनवतो. पण बहुतेक वेळा “ते त्याच्यापुरतंच असतं,” संगीता सांगते. याबाबत कुणाला टोकावं, किंवा ‘असं का’ हा विचार दोघीही बहिणींच्या मनात कधी आला नाहीये.