वयाच्या विशीपर्यंत अंगद साळुंखेच्या मनात आशेचा किरण तेवत होता. मग त्याचं रुपांतर चिंतेत झालं. काही वर्षांनी वैफल्य आणि हताशेने मन व्यापलं – आणि अखेर अंगदने हार पत्करली – त्याला नोकरी मिळणार नव्हती.
२००३ साली वयाच्या केवळ १८ व्या वर्षी अंगदने बीड जिल्ह्यातलं नागापूर गाव सोडलं आणि तो १४ किलोमीटरवरच्या बीड शहरात आला. “बीडमध्ये खोलीच्या भाड्यासाठी आई-वडलांनी जास्तीच्या पैशाची जुळणी केली,” तो सांगतो. त्यांनी जास्तीची कामं केली, सावकाराकडनं उसने पैसे घेतले. “कॉलेजची फी आणि इतर खर्च असं सगळं मिळून त्यांनी तीन वर्षात २०,००० रुपये खर्च केले असतील.”
बीएची पदवी प्राप्त केल्यानंतर अंगदने राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी सुरू केली. ही परीक्षा पास झाल्यावर त्याला प्रशासनातल्या उपजिल्हाधिकारी, पोलिस उप निरीक्षक, विक्री कर निरीक्षक आणि इतर राजपत्रित पदांसाठी अर्ज करता असता. मात्र उपलब्ध नोकऱ्या आणि त्यासाठी अर्ज करणारे विद्यार्थी यांचा कुठे मेळच बसत नाही. महाराष्ट्र राज्य लोक सेवा आयोगाचे अध्यक्ष, व्ही. एन. मोरे सांगतात, “दर वर्षी राज्य लोक सेवा आयोगाच्या विविध परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे १२-१४ लाख इतकी आहे आणि उपलब्ध नोकऱ्या मात्र ४०००-५००० इतक्याच आहेत. यातले दोन-सव्वा दोन लाख विद्यार्थी [राज्य लोक सेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या एकूण १४ परीक्षांपैकी] प्रशासकीय सेवा परीक्षांना बसतात, आणि उपलब्ध असणाऱ्या सरासरी जागा असतात ३००-३५०. २०१७-१८ साठी तर फक्त १४० [प्रशासकीय पदं] उपलब्ध होती.”
“मी खूप मेहनत घेतली, दिवस रात्र अभ्यास केला,” शेतातल्या बैलगाडीवर बसलेला, वयाची चौतिशी गाठलेला अंगद सांगतो. “२००७ मध्ये बीडमध्ये सरकारी रुग्णालयात लेखनिकाच्या पदासाठी माझं नाव यादीत आलं होतं, पण शिफारसपत्र देऊ शकणारं कुणी माझ्या माहितीत नव्हतं.” खरं तर अधिकृत प्रक्रियेमध्ये अशा कोणत्याही शिफारसपत्राची आवश्यकता नाही मात्र ‘वशिला’ आणि लागेबांध्यांच्या व्यवस्थेत मात्र ते लागतंच.





