‘जात्यावरच्या ओव्या’ या प्रकल्पाच्या या भागात पाऊस आणि शेत, नांगरणी आणि पेरणी या विषयीची गीते (ओव्या) सादर केलेली आहेत. यात जाई साखळे यांच्या आवाजातील आठ ओव्या आणि छबाबाई म्हापसेकर-सुतार यांच्या तीन फिल्म सामील केलेल्या आहेत. दोघी पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातील लवार्डे गावाच्या आहेत

हिंदू खगोलशास्त्र २७ नक्षत्रे मानते, त्यातील रोहिणी मृगाआधी येते आणि दोन्ही पावसाची नक्षत्रे आहेत. रोहिणी पावसाळ्यापूर्वीच्या म्हणजेच वळवाच्या सरी आणते तर मृग पावसाळा आणते. दोन्ही शेतीसाठी आणि शेतकऱ्यासाठी महत्त्वाची  नक्षत्रे आहेत. वळवाच्या सरी बरसल्या की शेतकरी नांगरणी करतात आणि पावसाळा लागल्यावर पेरण्या करतात. उन्हाळ्यात तापलेल्या जमिनीला पावसाळ्यापूर्वीच्या सरी भिजवतात आणि शीतल करतात.

महाराष्ट्राच्या काही भागातील ग्रामीण लोकमानसात ही दोन नक्षत्रे म्हणजे बहीण-भाऊ मानली आहेत. रूढीनुसार, बहिणीचं(रोहिणी) लग्न लहान वयातच, भावाच्या(मृग) आधी करतात. साहजिकच भावाआधी बहिणीला मूल होतं. या आठ ओव्यांच्या संग्रहातील एक महत्त्वाची ओवी या तुलनेवर आधारलेली आहे.

‘जात्यावरच्या ओव्या’ या प्रकल्पाकरिता महाराष्ट्रातील ९७ गावातील सुमारे ९७ स्त्रियांनी ही ओवी सादर केली. १९९६च्या जानेवारी महिन्यापासून १९९९च्या ऑक्टोबर पर्यंत ही ध्वनीमुद्रणं केली गेली.

यांतील एक, जाई साखळे २०१२ मध्ये निवर्तल्या. इथे सामील केलेली मुद्रणे त्यांनी बर्नार्ड बेल आणि त्याच्या सहकाऱ्यांसाठी गायली व या प्रकल्पासाठी ५ ऑक्टोबर १९९९ रोजी मुद्रित केली होती. २० एप्रिल २०१७ रोजी आम्ही त्यांच्या मुलीला, लीला शिंदे यांना भेटलो. त्यांनी आम्हाला त्यांच्या आईचा फोटो दाखवला.

PHOTO • Samyukta Shastri

जाई साखळे आणि त्यांची मुलगी लीला शिंदे आपल्या आईच्या फोटोसह

याच गावात आम्हाला छबाबाई म्हापसेकर-सुतार भेटल्या. त्या आता ७४ वर्षांच्या आहेत आणि या प्रकल्पाच्या संग्रहाच्या मूळ गायिकांपैकी या गावातल्या ११ जणीपैकी एक आहेत. ‘मला आता ती गाणी आठवत नाहीत’, त्या म्हणाल्या.  पण पावसासंबंधीच्या ओव्या आठवतात का, असं विचारलं तेव्हा काही ओव्या सहज त्यांच्या ओठांवर आल्या.

एप्रिल २०१७ च्या आमच्या भेटीत चित्रमुद्रित केलेल्या या व्हिडीओमध्ये बऱ्याच काळानंतर ओव्या गाण्याचा छबाबाईचा आनंद आणि उत्साह सहज जाणवतो.

छबाबाई आणि त्यांचा नवरा गोपाळ - तरूण वयात ते गावात सुतारकी करत – यांचा निरोप घेऊन आम्ही गावात इतर कुणी गाणारी भेटते का याचा शोध घ्यायला निघालो.

PHOTO • Samyukta Shastri

छबाबाई आणि त्यांचा नवरा गोपाळ आपल्या घरासमोर

‘जात्यावरच्या ओव्या’च्या या भागात जाई साखळेंनी गायलेल्या आठ ओव्या आहेत.

“फार काळ पाउस लागून राहिलाय नि माझा लेक शेतावर गेलाय. पाभर घेऊन तो गव्हाची पेरणी करतोय.” असं पहिली ओवी म्हणतेय. दुसऱ्या ओवीत थोडा बदल दिसतो, लेक भात पेरतोय.

तिसऱ्या ओवीत देखील गाणारी आपल्याला सांगते की पाऊस कोसळतोय आणि तिची मुलं पेरणीसाठी गेलीयेत.

चौथ्या ओवीत, पावसावरच्या या लोकप्रिय ओवीत, शेतकरीण सांगते की रोहिणीचा पाऊस मृगाच्या पावसाआधी पडतो; जसा भावाआधी बहिणीच्या घरी पाळणा हलतो. रोहिणीच्या सरी मृगाच्या पावसाआधी पडतात.

झोडपणारा वळवाचा पाऊस आणि पाभर सोडून जाईच्या झाडाखाली आसरा घेणारा तिचा मुलगा यांच्याबद्दल पाचवी ओवी सांगते.

सहाव्या ओवीत ती म्हणते की कुठल्या शेताकडे जावं हे तिला कळत नाहीये कारण तिथे कितीतरी शेतं आहेत. ‘म्हणून मी तुला सांगते की आपण बांधावर जाई लावू’ (म्हणजे आपलं शेत ओळखता येईल.)

सातव्या ओवीत ती आपल्या लेकाच्या शेतामध्ये उभी आहे आणि त्याला विचारते, ‘कधी केलंस इतकं सारं काम (तिला सांगायचंय की तिचा मुलगा खूपच कष्टाळू आहे.)

आठव्या ओवीत ती आपल्या शेतात जाऊन चरवी घेऊन पाण्याला जाईल असं सांगतीये. आणि म्हणते, ‘बैलांच्या आधी मी माझ्या तहानलेल्या औत्याला पाणी पाजीन.’

पाऊस गं पाडल्यानी फळी धरीली कवाशी
माझीया बाळाच्या शेती पाभर गव्हाची

पाऊसानी यानी फळी धरीली आताशी
माझीया बाळाच्या शेती पाभर भाताची

पाऊस यानी फळी धरीली वरुनी
माझी ना बाळं बाई निघाली पेरुनी

पाऊस पडतो मिरगाआधी रोहीणीचा
पाळणा हालतो भावाआधी बहिणीचा

वळीव पाऊस आला शिवार झोडीत
जाई झाडाखाली औत्या पाभार सोडीत

शेताआड शेत मी शेताला कंच्या जाऊ
सांगते बाळा तुला जाई बांधावरी लावू

शेताला जाईन उभी राहीन अधीमधी
सांगते बाळा तुला काम केलं कधी

शेताला जाईन चरवी नेईन पाण्याला
बैलाच्या आधी माझा औत्या तान्हेला


Photograph of Jai Sakhale
PHOTO • Samyukta Shastri

कलाकार: जाई साखळे

गाव : लवार्डे

तालुका : मुळशी

जिल्हा : पुणे

जात : नवबौद्ध

वय : मृत्यू २०१२

शिक्षण: निरक्षर

मुले : एक मुलगी

ध्वनिमुद्रणाची तारीख : ५ ऑक्टोबर १९९९

Mugshot of Chababai
PHOTO • Samyukta Shastri

कलाकार: छबाबाई म्हापसेकर/सुतार

गाव : लवार्डे

तालुका : मुळशी

जिल्हा : पुणे

जात : सुतार

वय : ७४

शिक्षण: निरक्षर

मुले : एक मुलगी, दोन नातवंडं

व्यवसायः छबाबाईंचे पती गावात बलुत्यावर सुतारकी करत असत. त्यांच्या दोन एकरावर ते भाताचं पीक घेतात. घरच्या कोंबड्यांपासूनही वरचं उत्पन्न मिळतं.

ध्वनिमुद्रणाची तारीख : ३० एप्रिल २०१७


लेखमाला - शर्मिला जोशी

पोस्टरः श्रेया कात्यायनी

अनुवाद: छाया देव

नमिता वाईकर लेखक, अनुवादक आणि पारीच्या व्यवस्थापकीय संपादक आहेत. त्यांची ‘द लाँग मार्च’ ही कादंबरी २०१८ मध्ये प्रकाशित झाली आहे.

यांचे इतर लिखाण नमिता वाईकर
PARI GSP Team

पारी-जात्यावरच्या ओव्या गटः आशा ओगले (अनुवाद), बर्नार्ड बेल (डिजिटायझेशन, डेटाबेस डिझाइन, विकास, व्यवस्थापन), जितेंद्र मैड (अनुलेखन, अनुवाद सहाय्य), नमिता वाईकर (प्रकल्प प्रमुख, क्युरेशन), रजनी खळदकर (डेटा एन्ट्री)

यांचे इतर लिखाण PARI GSP Team
Photos and Video : Samyukta Shastri

संयुक्ता शास्त्री पारीची मजकूर समन्वयक आहे. तिने सिम्बायोसिस सेंटर फॉर मिडिया अँड कम्युनिकेशन, पुणे इथून मिडिया स्टडिज या विषयात पदवी घेतली आहे तसंच एसएनडीटी महिला विद्यापीठातून इंग्रजी साहित्य या विषयात एम ए केलं आहे.

यांचे इतर लिखाण संयुक्ता शास्त्री
Editor and Series Editor : Sharmila Joshi

शर्मिला जोशी पारीच्या प्रमुख संपादक आहेत, लेखिका आहेत आणि त्या अधून मधून शिक्षिकेची भूमिकाही निभावतात.

यांचे इतर लिखाण शर्मिला जोशी
Translator : Chhaya Deo

छाया देव या शिक्षणक्षेत्रातील बाजारीकरणाच्या विरोधात व गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या हक्कासाठी काम करणाऱ्या शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच या संघटनेच्या नाशिकस्थित कार्यकर्त्या आहेत. त्या स्फुट लेखन व भाषांतराचे कामही करतात.

यांचे इतर लिखाण छाया देव