मथुरा निरगुडे खुदकन हसते आणि मोठ्याने पण कुजबुजत सांगते, “त्यांनी आम्हाला काहीच शिकवलं नाहीये.” नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या टाके हर्ष गावात आपल्या एका खोलीच्या घराशेजारी बैलगाडीपाशी मथुरा बसलीये. या गावच्या १५०० रहिवाशांपैकी बहुतेक ठाकर या आदिवासी समुदायाचे आहेत.
२०१७ साली डिसेंबरपर्यंत ११ वर्षांची मथुरा सुमारे आठ किलोमीटरवर असणाऱ्या डहाळेवाडीतल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत पाचव्या इयत्तेत शिकत होती. त्यानंतर राज्य शासनाने ही शाळा बंद केली. आता ती टाके हर्षपासून चार किलोमीटरवर असणाऱ्या आव्हाटे गावी एका सामाजिक संस्थेने सुरू केलेल्या शाळेत सहावीत शिकतीये.
दोन्हीतली कोणती शाळा तुला आवडते असं विचारताच ती म्हणते, “आधीची.”
डहाळेवाडीची जिल्हा परिषद शाळा बंद झाल्यानंतर आव्हाट्यातल्या शाळेने तिथल्या १४ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला, भगवान मधे सांगतात. याच तालुक्यातल्या वावी हर्षमध्ये राहून ते शिक्षण क्षेत्रात काम करतात. “सरकारकडून कसलंही अनुदान मिळत नाही आणि ते काही मन लावून शाळा चालवत नाहीत,” ते सांगतात. आव्हाट्याच्या शाळेत – श्री गजानन महाराज विद्यालय - आठवड्यातून दोनदाच वर्ग भरतात.
डहाळेवाडीची जि.प. शाळा बंद झाल्याने जसं मथुराचं नुकसान झालं, तसंच अनेकांचं झालं. महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत हजारो मुलांच्या शाळा बंद झाल्या आहेत.







