राजेश अंधारे यांना त्यांच्या आयुष्यातला पहिला स्मार्टफोन हातात घेण्यासाठी २,५०० रुपयांचं डाऊन पेमेंट करावं लागलं. दोन वर्षं होऊन गेलेत तरी त्यांना तो अजूनही वापरता येत नाही. "ती माझ्या मोठ्या दिनेशकरिता भेट होती, जो शाळा पास झाला होता," ४३ वर्षांचे राजेश म्हणतात. "आम्ही उरलेली रक्कम रु. १,००० च्या पाच हफ्त्यांमध्ये फेडली. म्हणजे फोन रू. ७,५०० ला पडला."
स्मार्टफोन १६ वर्षांच्या दिनेशकडे असला तरी महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात डोंगरी गावी आपल्या राहत्या घरी राजेश यांनीही तो वापरून पाहिलाय – पण फुकाच.
राजेश यांची महिनाभर मजुरी करून साधारण जेवढी कमाई होते – रू. २५०-३०० रोजंदारीवर – तेवढी त्या फोनची किंमत होती. "तो कसा वापरायचा ते शिकून पाहिलं," ते म्हणतात, "पण काही दिवसांनी मी तो नाद सोडला. आपला जुना फोनच बरा, त्याला धड बटणं तरी आहेत."
त्यांच्या मुलाची पिढी मात्र या आदिवासी बहुल, खडतर आणि गरीब घरांची संख्या जास्त असणाऱ्या तालुक्यातील प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा स्मार्टफोन वापरण्यात पटाईत आहे. अभाव आहे तो केवळ पैशाचा आणि संपर्काचा किंवा कनेक्टिव्हिटीचा.
गुजरात सीमेलगत असलेला हा आदिवासी पट्टा मुंबईहून फक्त १३० किमी अंतरावर आहे – पण इंटरनेटचं जाळं मात्र फारत विस्कळित. "वीजदेखील अधून मधून जात असते, खास करून पावसाळ्यात," राजेश सांगतात. ते वारली आदिवासी आहेत.
त्यामुळे डोंगरीमध्ये एखाद्या झाडाखाली मुलांचा घोळका बसलेला दिसला, तर तिथे चांगलं नेटवर्क मिळत असणार, हे समजून चला. त्यांपैकी एका दोघांकडे स्मार्टफोन असतो, बाकीचे कुतुहलाने त्याकडे बघत असतात. आणि हो, मुलंच बरं का. इथे मुलींच्या हाती स्मार्टफोन सापडणं अवघड आहे.









