कडलूरच्या बंदरावर वेणीने वयाच्या १७ व्या वर्षी मासळीचा धंदा सुरू केला होता. आणि तिच्या गाठीला होते केवळ १,८०० रुपये, तिच्या आईने या धंद्यासाठी भांडवल म्हणून दिलेले. आज वयाच्या ६२ व्या वर्षी वेणी या बंदरावच्या लिलावातली एकदम तरबेज व्यावसायिक आहे. खूप अडचणींवर मात करत तिने जसं तिचं घर बांधलं तसंच हा धंदा देखील “एकेक पायरी” रचत तिने उभा केला. आणि त्याचा तिला सार्थ अभिमान आहे.
वेणीचा नवरा व्यसनी होता. तो सोडून गेल्यानंतर तिने आपल्या चार मुलांना एकटीने मोठं केलं. तिची रोजची कमाई फारशी काही नव्हती. जगण्यासाठी कशीबशी पुरेल एवढी. रिंग सिएन मासेमारी सुरू झाल्यावर तिने बोटींमध्ये पैसा गुंतवला. लाखोंचं कर्ज काढलं. या गुंतवणुकीचा परतावा मात्र चांगला आला आणि त्यातूनच तिने आपल्या मुलांची शिक्षणं केली आणि घर बांधलं.
१९९० चं दशक संपत असतानाच कडलूरमध्ये रिंग सिएन मासेमारी लोकप्रिय व्हायला लागली होती. २००४ च्या त्सुनामीनंतर तिचा वापर जास्त वाढला. या प्रकारच्या मासेमारीमध्ये बांगडा, टारली, वेरली किंवा मांदेलीसारख्या माशांच्या थव्यांभोवती वेढा घालून त्यांना जाळ्यात घेतलं जातं.
या धंद्यात भांडवल पण हवं आणि हाताखाली कामाला लोकही. त्यामुळे मग छोट्या मच्छीमारांनी भागधारकांचे गट बनवायला सुरुवात केली. यातून खर्च आणि नफा दोन्ही वाटला जाऊ लागला.
बोटींवर फक्त पुरुषांचं राज्य असतं. पण त्या एकदा का धक्क्याला लागल्या की सगळं काम बाया हातात घेतात. मासळीचा लिलाव, मासे कापून देणं, सुकवणं, सगळी घाण साफ करणं, बर्फाची विक्री आणि चहा व जेवणाची सोय, सगळं काही. मच्छीमार बायकांना शक्यतो मासे विक्रेत्या म्हणून ओळखलं जात असलं तरी त्यातल्या अनेक विक्रेत्यांसोबत मासळीची वेगवेगळी कामं करत असतात. असं असलं तरी मत्स्यव्यवसायामध्ये बायका किती विविध प्रकारचं काम करतात आणि त्याचं मोल याची फारशी दखल घेतली जात नाही.