घराबाहेर, मोठाल्या चिंचांच्या सावलीत मणीराम मंडावी बासरीचा बांबू तासण्याचं काम करतायत. या बासरीतून वारा गेला की गोड सूर उमटतातच पण जंगली जनावरांना घाबरवायला ही बासरी शस्त्र म्हणूनही उपयोगी पडते. ४२ वर्षीय मंडावी म्हणतात, “त्या काळी वाघ, चित्ते आणि अस्वलं होती जंगलात. पण ही बासरी अशी घुमवली ना की ते प्राणी जवळ यायचे नाहीत.”
ते या बांबूच्या वाद्याला ‘फिरती बासरी’ किंवा छत्तीसगढीमध्ये सुकुड बांसुरी म्हणतात. त्याला फुंकण्यासाठी तोंड नसतं फक्त दोन्ही बाजूला हवा आत जाण्यासाठी भोकं असतात. आणि यातून स्वर उमटण्यासाठी ती हवेत घुमवावी लागते.
मणीराम दिवसाला एक बासरी बनवू शकतात आणि जवळपासच्या शहरांमध्ये जर प्रदर्शनं असतील तर तिथे किंवा हस्तकला संस्थांकडून त्यांना एका बासरीमागे ५० रुपये मिळतात. गिऱ्हाईक याच बासऱ्या नंतर ३०० रुपयाला एक विकत घेतात.
तीस वर्षं झाली असतील, मणीराम यांची एकदा अचानक मंदार सिंग मंडावी या निष्णात बासरी कारागिराशी भेट झाली. “मी १५ वर्षांचा असेन,” ते म्हणतात. “मी जंगलात सरपण गोळा करायला गेलो होतो तेव्हा त्यांनी मला हाक मारली आणि म्हणाले, ‘तू तसाही शाळेत जात नाहीस ना. ये, मी तुला काही तरी शिकवतो’.” आणि मग मणीराम यांनी शाळा सोडली आणि दिवंगत मंडावींसोबत काम करू लागले.




