वाघाची डरकाळी. कुत्र्याचं भुंकणं. आणि माणसांचा जोरजोरात आरडाओरडा ऐकायला येतो.
चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पापासून सुमारे १०० किलोमीटर अंतरावर तुम्ही असलात तर या आवाजांमध्ये वावगं असं काही नाही.
वेगळं मात्र निश्चित आहे. कारण हे वेगवेगळे आवाज मांगी गावातल्या एका स्पीकरवरून येत होते. आणि ते चक्क रेकॉर्ड केलेले होते. विदर्भातल्या या गावातल्या तुरीच्या आणि कपाशीच्या रानात मध्यावरती एका बांबूला मेगाफोन लटकवलाय. बॅटरीवर चालणाऱ्या कीटकनाशक फवारणीच्या पंपाला तो जोडलेला आहे.
“हा भोंगा रात्री वाजवला नाही तर रानडुकरं किंवा नीलगायी येऊन सगळी पिकं खाऊन जातील,” ४८ वर्षीय सुरेश रेंघे सांगतात. जंगली जनावरांना घाबरवण्यासाठी त्यांनी केलेली ही सगळ्यात नवी युक्ती आहे. “त्यांना तूर आणि हरभरा फार आवडतो,” ते सांगतात. पिकांची प्रचंड नासाडी होते हे सांगायलाच नको.
सौरऊर्जेवर चालणारं किंवा विजेचा प्रवाह सोडलेलं कुंपण घातलं तरी या प्राण्यांना थोपवणं अशक्य झाल्यामुळे ते मेगाफोनची पिन बॅटरीवर चालणाऱ्या फवारणी पंपाच्या सॉकेटमध्ये घालतात. आणि अचानक जंगली प्राणी आणि माणसांचे जोरजोरात आवाज हवेत घुमायला लागतात.















