‘‘माझे अब्बू मजुरी करत असत, पण मासेमारी करायला खूप आवडायचं त्यांना. किलोभर तांदळासाठी पुरतील एवढेच पैसे ते जेमतेम दिवसभरात कमवायचे आणि मग… नंतरचा संपूर्ण दिवस ते आणि त्यांची मासेमारी!’’ बेलडांगामधल्या उत्तरपारा गावात राहाणारी कोहिनूर बेगम आपल्या घराच्या गच्चीवर बसून सांगत असतात. ‘‘माझी अम्मी मग घरातलं बाकीचं सगळं बघायची.’’
‘‘अब्बूंनी आणलेल्या त्या एक किलो तांदळात आम्ही किती जण जेवायचो? आम्ही चार मुलं, आमची दादी, अब्बू, अम्मी आणि आमची आत्या,’’ बोलता बोलता ती क्षणभर थांबते आणि म्हणते, ‘‘वर त्यातला थोडा तांदूळ अब्बू तिच्याकडून मागून न्यायचे, माशांना आमिष म्हणून. या माणसाचं काय करावं ते आम्हाला कळायचंच नाही!’’
बंगालमधल्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात असलेल्या जानकी नगर प्राथमिक शाळेत ५५ वर्षांच्या कोहिनूर आपा मुलांसाठी मध्यान्ह भोजन बनवतात. हे काम करून उरलेल्या वेळात त्या विड्या वळतात आणि या कामात असलेल्या महिलांच्या हक्कांबद्दल लोकांमध्ये जागृती करतात. मुर्शिदाबादमध्ये अत्यंत हलाखीत जगणार्या बायका विड्या वळतात. प्रचंड थकवणारं काम आहे हे. लहान वयापासूनच सतत तंबाखूच्या संपर्कात आल्याने त्यांच्या आरोग्याला खूप मोठा धोका निर्माण होतो. (वाचा : विड्या वळता वळता वठलं आयुष्य आणि आरोग्य)
२०२१ साली डिसेंबर महिन्यातल्या एका सकाळी विडी कामगारांच्या एका आंदोलनात कोहिनूर आपा मला भेटल्या. नंतर, थोडी फुरसत मिळाल्यावर आपल्या बालपणाबद्दल बोलल्या, विडी कामगारांचं अत्यंत कष्टदायक काम आणि शोषण करणारी परिस्थिती सांगणारं स्वतः रचलेलं गाणंही गायल्या.
लहानपणी कोहिनूर आपाच्या घरची आर्थिक परिस्थिती खूपच वाईट होती आणि त्यामुळे घरात सतत काही ना काही कुरबुर चालू असायची. छोट्या कोहिनूरला ते सहनच व्हायचं नाही. ‘‘जेमतेम नऊ वर्षांची होते तेव्हा मी,’’ त्या सांगतात. ‘‘एक दिवस सकाळी मी पाहिलं, कोळसा, लाकूड आणि गोवर्या घालून चूल पेटवताना अम्मी रडतेय. ती चूल पेटवत होती खरी, पण शिजवायला घरात धान्यच नव्हतं आणि म्हणून ती रडत होती.’’






