“वीटभट्टीच्या आत लॉकडाऊन नाही. आम्ही रोज नेहमीसारखंच काम करतोय तिथे,” हृदय पाराभूंनी मला सांगितलं होतं. ५ एप्रिलला आम्ही त्यांना भेटलो होतो. “एकच बदल झालाय, आठवडी बाजार बंद आहे. त्यामुळे मालकाकडून आठवड्याचा भत्ता मिळूनही आम्हाला धान्य आणि इतर गरजेच्या वस्तू घेता येत नाहीयेत.”
हृदय तेलंगणमधल्या वीटभट्टीवर गेली तीन वर्षं काम करतायत. डोक्यावरच्या कर्जाने त्यांना या कामात ढकललंय. ओरिसाच्या बलांगीर जिल्ह्यातल्या तुरेकेला तालुक्यामधलं खुटुलुमुंडा हे त्यांचं गाव. दर वर्षी ते आपल्या बायकोला गावातच ठेवून कामासाठी इथे येतात. “लोहार म्हणून गावात माझी चांगली कमाई होत होती. पण घर बांधायला कर्ज घेतलं. लगेचच नोटबंदी झाली,” मोडक्यातोडक्या हिंदीत ते सांगतात. “गावात आता अगदीच थोडी कामं मिळतात. कर्जही दिवसेंदिवस वाढत चाललंय. त्यामुळे विटा बनवायला मला यावंच लागलं इथे. या वीटभट्टीवरचा प्रत्येक जण कर्जात बुडालेला आहे.”
संगारेड्डी जिल्ह्यातल्या जिन्नराम मंडलात गड्डीपोथरम नावाचं गाव आहे, तिथल्या वीटभट्टीवर हृदय काम करतात. २५ मार्चपासून अनपेक्षितपणे सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे इथे काम करणारे मजूर गोंधळून गेले. “दर शुक्रवारी आम्ही इथून तीन किलोमीटरवर असलेल्या आठवडी बाजारात जायचो. आम्हाला मिळणाऱ्या आठवड्याच्या भत्त्यातून भाज्या, किराणा घेऊन यायचो,” जयंती पाराभू सांगते. ती हृदयची दूरची नातलग आहे. त्याच वीटभट्टीवर त्याही काम करतात. “काही पुरुष दारूही आणायचे तिथून. आता लॉकडाऊनमुळे बाजारच बंद आहे, त्यामुळे सगळंच थांबलंय.”
लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर दोनच दिवसांनी शुक्रवार होता. त्या दिवशी या वीटभट्टीवरच्या मजुरांनी बाजारात जाऊन थोडं धान्य आणलं. त्यानंतरच्या शुक्रवारी मात्र ते गेले आणि अडकले. कारण तोपर्यंत बाजार बंदच झाला होता. “त्यानंतर आम्हाला अन्नधान्य मिळवणं खूपच कठीण गेलं,” हृदय सांगतात. “बाजार बंद होता म्हणून आम्ही एखादं तरी दुकान उघडं आहे का ते बघायला थोडं आत, गावात गेलो, तर पोलिसांनी आम्हाला हाकलून लावलं. त्यांची भाषा [तेलगू] येत नाही ना आम्हाला!”








