मध्य मुंबईपासून ९५ किलोमीटरवर ठाणे जिल्ह्याच्या निंबवली गावातल्या सपऱ्या डोंगराच्या पायथ्याशी आहे आमचा गरेलपाडा. या छोट्याशा आदिवासी पाड्यावर अगदी मोजकी २०-२५ घरं आहेत.
दर वर्षीप्रमाणे या वर्षीदेखील पाड्यावर पारंपरिक पद्धतीने दिवाळी साजरी झाली. महिन्याच्या सुरुवातीलाच सगळे जण सणाच्या तयारीला लागले.
आमच्या समुदायासाठी या सणाचे चार महत्त्वाचे दिवस म्हणजे वाघबारसी, बारकी तिवली, मोठी तिवली आणि बलिप्रतिपदा. या वर्षी नोव्हेंबर ५-८ दरम्यान आम्ही हे सण साजरे केले.
वारली लोक वाघाला देव मानतात आणि वाघबारसीच्या दिवशी आम्ही त्याची पूजा करतो. बहुतेक आदिवासी पाडे जंगलांमध्ये आहेत. आणि पूर्वी वारलींचं जीवन पूर्णपणे जंगलावर अवलंबून होतं. ते त्यांची जनावरं चारायला जंगलात घेऊन जायचे, आणि आजही बरेच जण हे करतायत. या जनावरांवर हल्ला करू नये म्हणून ते वाघाची प्रार्थना करायचे – आणि याच भीतीतून त्याची पूजा करणं सुरू झालं.












