सोसाट्याचं वारं वाहू लागलं, मुसळधार पाऊस सुरू झाला आणि २० मे रोजी अम्फान वादळाने थैमान मांडलं तरी सबिता सरदार घाबरल्या नव्हत्या. “आम्हाला अशा खराब हवामानाची सवय आहे. मला नाही भीती वाटली. खरं सांगायचं, तर त्या काँक्रीटच्या इमारतींमध्ये राहणारेच जास्त घाबरले होते,” त्या सांगतात.
चाळीस वर्षं झाली, सबिता दक्षिण कोलकात्यातल्या बाजारपेठेतल्या गरियाहाटमध्ये रस्त्यावर राहतायत.
हे महाचक्रीवादळ ज्या दिवशी पश्चिम बंगालच्या या राजधानीत धडकलं, तेव्हा सबिता आणि इतर काही बेघर महिला गरियाहाट पुलाखाली त्यांच्या हातरिक्षामध्ये बसून चिकटून बसून राहिल्या. ती रात्र त्यांनी तशीच काढली. “काचांचे तुकडे उडून येत होते, झाडं उन्मलून पडत होती आणि आम्ही तिथेच बसून होतो. पावसाचा ओसारा जोरात येत होता आणि आम्ही भिजून गेलो होतो. धडाड धूम आवाज येत होते,” सबिता तेव्हाच्या घटना आठवून सांगतात.
आदल्याच दिवशी त्या पुलाच्या खाली त्यांच्या ठिकाण्यावर परतल्या होत्या. “मी माझ्या मुलाच्या घरून अम्फानच्या आदल्याच दिवशी गरियाघाटला परत आले होते. माझी भांडी, कपडे विखुरलेले होते, जणू काही कुणी सगळं खणून काढलं असावं,” सुमारे ४७ वर्षांच्या सबिता सांगतात. त्या त्यांच्या मुलाच्या घरून चार किलोमीटर अंतर चालत आल्या होत्या. २७ वर्षीय राजू सरदार आणि त्याची बायको, २५ वर्षीय रुपा आणि तिची धाकटी बहीण टॉलीगंजमधल्या झलदार मठ झोपडपट्टीतल्या भाड्याच्या घरात राहतात.
२५ मार्च रोजी टाळेबंदी लागली तेव्हा कोलकाता पोलिसांनी गरियाहाटमधल्या रस्त्यावर राहणाऱ्या लोकांना एका निवारा केंद्रात पाठवलं होतं, तिथनं त्या झलदार मठला गेल्या होत्या. त्या दिवशी पोलिस आले आणि उड्डाणपुलाखाली राहणाऱ्या सबिता आणि इतरांना भेटले, “त्यांनी आम्हाला सांगितलं की या [करोना] विषाणूमुळे आम्ही रस्त्यावर राहू शकत नाही, आणि आम्हाला निवाऱ्यात जावं लागेल म्हणून,” त्या सांगतात. कोलकाता महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक ८५ मधल्या एका मोठ्या सभागृहात त्यांना नेण्यात आलं.






