“आम्हाला इथनं बाहेर निघायचंच नव्हतं. सुरुवातीला आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. नंतर नंतर, वन अधिकारी आले की आम्ही लपून बसायचो... असे किती तरी दिवस गेले,” तालगावमध्ये राहणारे बाबुलाल कौंधर सांगतात. “मला वाटतं २००८ मध्ये निर्णय झाला असावा. वन अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की वाघांची संख्या वाढलीये आणि त्यामुळे आम्ही तात्काळ इथनं बाहेर निघून जायला पाहिजे.”
आपलं गाव सोडायला नकार दिल्यानंतर चार वर्षांनी २०१२ मध्ये तालगावच्या आदिवासींना आपलं वंशपरंपरागत गाव सक्तीने सोडावं लागलं आणि १६ किलोमीटरवरच्या सारथपुरा या पाड्यावर वस्तीला यावं लागलं. तारा-टेक म्हणून ओळखला जाणारा हा पाडा पन्ना जिल्ह्यातल्या अमनगंजला जाणाऱ्या महामार्गाच्या जवळ आहे.
२००८-२००९ मध्ये मध्य प्रदेशातल्या पन्ना व्याघ्र प्रकल्पात एकही वाघ उरला नव्हता, तेव्हा वाघांच्या अतिमहत्त्वाच्या अधिवासांसाठी अबाधित जागा तयार करण्यासाठी १२ गावं हलवण्यात आली होती. तालगाव त्यातलंच एक गाव. २०११ सालच्या एका अहवालानुसार, या अभयारण्याच्या कोअर एरियामध्ये १६ गावं होती (पन्ना जिल्ह्यात ११ आणि छत्तरपूर जिल्ह्यात ५, जी चार गावं हलवली नाहीत त्यांची सद्यस्थिती काय आहे याची कल्पना नाही).
२०११ च्या जनगणनेनुसार तालगावमध्ये १७१ कुटुंबांची नोंद झाली आहे, ज्यात प्रामुख्याने राज गोंड आदिवासी आहेत. यातली केवळ ३७ कुटुंबं सारथपुरामध्ये आहेत. बाकीची सतना, कटनी आणि अजयगडसारख्या शहरांमध्ये स्थलांतरित झाली.
मात्र या पुनर्वसन प्रक्रियेमध्ये अनेक नियम आणि कायद्यांचा भंग झाला आहे. वन व पर्यावरण मंत्रालयाच्या देखरेखीखाली असणाऱ्या व्याघ्र प्रकल्प सेक्शन ४.९ मध्ये पुनर्वसनासाठी दोन पर्याय दिले आहेतः दहा लाख रुपयांची भरपाई घेऊन एखादं कुटुंब स्वतः पुनर्वसनाचा मार्ग निवडू शकतं किंवा वन खातं आणि जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः पुनर्वसनाची प्रक्रिया पार पाडली पाहिजे.










