शांतीलाल, शांतू, तिन्योः नावं तीन, व्यक्ती एक. आपण चौथं नाव निवडू या. सबरकांठा जिल्ह्याच्या वडाली गावाच्या भाषेत त्याचं नाव होईल शोंतू. तर हा आहे शोंतू.
हा एक विलक्षण असामी आहे. असामान्य, एकमेव, विख्यात अशा अर्थाने नाही बरं. तर सत्यप्रिय, गरीब, दलित असल्याने चिकाटी असलेला, हाल काढणारा आणि गोंधळलेला. कधी कधी तर असा कुणी व्यक्ती आहे का नाही असा प्रश्न पडावा. आणि कधी एखाद्या अतिसामान्य माणसाचं टिचकीभर अस्तित्व असतं तितकाच तो असतो.
सहा माणसांच्या कुटुंबात तो लहानाचा मोठा झाला - आई-वडील, मोठा भाऊ आणि दोघी बहिणी (एक त्याच्याहून धाकटी) - अत्यंत हलाखीत. कुटुंबाच्या वाढत्या गरजांना कायम चाप लागलेले. आई-वडील आणि मोठी दोघं भावंडं दोन वेळचं जेवण मिळेल इतकं कमावत होते. वडील एका मेटॅडोअरने माल वाहतूक करायचे. कधीही जादा कुणी भाडं घ्यायचे नाहीत. त्यामुळे वरची काहीही कमाई व्हायची नाही. आई रोजंदारीवर कामाला जायची. तिला कधी काम मिळायचं, कधी नाही. वडील दारूडे नव्हते आणि त्यामुळे घरात फार काही गोंधळ नसायचा हीच मोठी कृपा होती. शोंतूला मात्र हे फार उशीरा उमगलं.
तो वडालीच्या शारदा हायस्कूलमध्ये नववीत शिकत होता तेव्हा त्याच्या गावी सर्कस आली होती. पण तिकिटं महाग होती. शाळेतल्या विद्यार्थ्यांना मात्र पाच रुपयांत जाता येणार होतं. शोंतूकडे शाळेत नेण्यासाठी एक कवडीही नव्हती. “उभा रहा,” शिक्षिका म्हणाल्या. “बेटा, तू पैसे का नाही आणलेस?” त्यांचा आवाज प्रेमळ वाटला. “बाई, माझे वडील आजारी आहेत आणि कपाशीच्या जिनिंग कारखान्यातून आईला तिची मजुरी अजून मिळाली नाहीये,” शोंतूला रडू फुटलं.
दुसऱ्या दिवशी त्याच्या वर्गातल्या कुसुम पठाणने त्याला १० रुपये दिले, ‘रमझानच्या काळात दुवा मिळावी म्हणून’. दुसऱ्या दिवशी तिने त्याला विचारलं, “मी तुला पैसे दिले होते, त्याचं तू काय केलंस?” शोंतू फार प्रामाणिक होता. “पाच रुपये मी सर्कसच्या तिकिटासाठी खर्चले आणि उरलेले पाच घरी लागतील म्हणून दिले.” कुसुम, रमझान, शोंतू आणि सर्कस - साजिरं जग होतं ते.
तो अकरावीत होता तेव्हा त्यांचं चिखलमातीचं घर पाडून त्या जागी सिमेंट-विटांचं बांधकाम करावं लागणार होतं. गिलावा वगैरे काहीच नाही. परवडणारच नव्हता. एक गवंडी नेमला होता. आणि बाकी सगळं काम घरच्यांनी मिळूनच केलं होतं. यामध्ये इतका सगळा वेळ गेला की थेट वार्षिक परीक्षाच जवळ येऊन ठेपली. त्याची उपस्थिती कमी भरली. मुख्याध्यापकांना भेटून, विनवण्या केल्यानंतर शोंतूला परीक्षा देण्याची परवानगी मिळाली.
तर तो बारावीत गेला आणि आता मात्र चांगला अभ्यास करायचा त्याने निर्धार केला. शोंतूने तयारी पण जोरदार केली पण त्याची आई आजारी पडली. तिचा आजार अगदी झपाट्याने बळावला. बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या अगदी आधी त्याची आई गेली. ही वेदना, आईचं जाणं जेमतेम १८ वर्षांच्या शोंतूच्या अगदी जिव्हारी लागलं. परीक्षा अगदी समोर येऊन ठेपलीये त्याचा ताणही जाणवत होता, पण कितीही प्रयत्न केले तरी फायदा काही झाला नाही. त्याला ६५ टक्के मिळाले. पुढे अभ्यास करावा हा विचार सोडून द्यावा असं शोंतूला वाटायला लागलं.
त्याला वाचायला फार आवडायचं त्यामुळे तो गावातल्या सार्वजनिक वाचनालयात जायला लागला. घरी पुस्तकं आणू लागला. त्याची ही आवड पाहून त्याच्या एका मित्राने वडाली कला महाविद्यालयात प्रवेश घे आणि इतिहास विषयात पदवी घे असं त्याला सुचवलं. “तुला भारी भारी पुस्तकं वाचायला मिळतील,” तो म्हणाला. शोंतूने कॉलेजमध्ये प्रवेश घेतला पण तो फक्त पुस्तकं आणायला आणि परत करायला तेवढा तिथे जायचा. बाकी दिवसभर तो कॉटन जिनिंग मिलमध्ये काम करायचा. संध्याकाळी पुस्तकं वाचायचा आणि हो इथेतिथे मजामस्ती सुद्धा करायचा. त्याला बीएच्या पहिल्या वर्षी ६३ टक्के गुण मिळाले.
त्याच्या शिक्षकांनी त्याचा निकाल पाहिला आणि त्यांनी कॉलेजला नियमित येण्याची विनंती केली. शोंतूला अभ्यास आवडू लागला. तो आता तिसऱ्या वर्षात होता. उत्तम वाचनकौशल्य असणाऱ्या विद्यार्थ्याला गुणवत्ता प्रमाणपत्र देण्याचा वडाली कॉेलजने निर्णय घेतला होता. आणि ते शोंतूलाच मिळालं.







