या आठवड्यात वारी पंढरपूरच्या दिशेने निघाली आहे. जात्यावरच्या ओव्यांच्या या मालिकेत पुणे जिल्ह्यातल्या कोळवडे गावच्या चार ओवीकार ज्ञानेश्वर आणि तुकाराम हे आपले आवडते संत आणि आळंदी आणि देहू या त्यांच्या गावांबद्दलच्या दहा ओव्या गातायत
ज्ञानेश्वर (१३ वं शतक) आणि तुकाराम (१७ वं शतक) हे महाराष्ट्राचे अग्रणी संत. दोघांच्या या पृथ्वीतलावरच्या काळात तीनशे वर्षांचं अंतर असलं तरी लोकांच्या मनात मात्र ते एकमेकांसोबतच येतात. त्यांचा प्रभाव इतका खोल आहे की इतकी शतकं लोटली तरीही आज त्यांच्या पादुका घेऊन वारकरी त्यांचे अभंग गात पायी पंढरपुराला जात आहेत.
हे दोघंही पुरोगामी भक्ती मार्गाचे संत. दोघांनीही सर्व मानव समान असल्याचा पुरस्कार केला आणि जातीभेदांवर आधारित समाजव्यवस्थेला विरोध केला. यामुळे अर्थातच अभिजन ब्राह्मण संतापले पण त्याच वेळी सामान्य लोकांचं उदंड प्रेम आणि आदर त्यांना मिळाला. या दोघांचे विचार त्यांना पटले आणि त्यांचा खोल प्रभाव जन सामान्यांवर आपल्याला पहायला मिळतो.
आपल्या पुन्हा तुकाराम या पुस्तकात कवी आणि समीक्षक दिलीप चित्रे (१९३८-२००९) लिहितात की तुकारामांच्या रचनांवर ज्ञानेश्वर आणि नामदेवांचा प्रभाव होता. तुकारामांच्या रचनांचा संग्रह असणाऱ्या तुकाराम गाथेमध्ये महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातलं जीवन, लोकांच्या मौखिक परंपरा आणि शेतीशी संबंधित असणाऱ्या शेतकरी आणि इतर समुदायांचं जीवन यावर मोठ्या प्रमाणात भाष्य केलेलं आहे.
ज्ञानेश्वरांचे दोन महत्त्वाचे ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी, जी भगवद् गीतेवरील मराठी निरुपण आहे आणि अनुभवामृत. याचा दिलीप चित्रे यांनी इंग्रजीत अनुवाद केला आहे – अनुभवामृतः द इममॉर्टल एक्स्पिरियन्स ऑफ बीइंग.
दर वर्षी आषाढामध्ये (जून/जुलै) २१ दिवसांची पायी वारी निघते. पुणे जिल्ह्याच्या आळंदी आणि देहूहून या दोन्ही संतांना वंदन करण्यासाठी आणि विठ्ठलाला भेटण्यासाठी वारकरी निघतात. सोलापूरमधल्या पंढरपुरात वारी पोचते. (वारी आणि भक्ती मार्गाबद्दल अधिक माहितीसाठी मागील आठवड्यातील वारकऱ्यांची वारी हा लेख पहा.)




