“आज गोळा केलेल्या सगळ्या वस्तू मी वेगवेगळ्या केल्या आहेत. ते (भंगार खरेदी करणारे व्यापारी) या वस्तू घेतील, त्यांचं वजन करतील आणि पैसे देतील,” उरलेले पेपर आपल्या पिशवीत कोंबत कालू दास सांगत होते. “त्यानंतर जर गाडी वेळेवर मिळाली तर दोन तासांत मी घरी पोचेन.”
सप्टेंबरच्या सुरुवातीला ६० वर्षांचे कालू दास दक्षिण २४ परगणातील हसनपूर या आपल्या गावाहून शेअर टोटो (ऑटोरिक्षा) आणि बसने प्रवास करत जवळपास २८ किलोमीटरवरच्या कोलकात्यात आले होते. कित्येक महिन्यांनंतरची ही त्यांची दुसरीच चक्कर होती. या आधी ते ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात आले होते. त्यांच्या खांद्यावर एक मोठी, झोळीसारखी पांढरी पिशवी लटकत होती.
दास मागील २५ वर्षांपासून दक्षिण आणि पूर्व कोलकाताच्या वेगवेगळ्या भागातून भंगार गोळा करतायत. भंगारवाला बनण्याआधी ते एका चित्रपट वितरण कंपनीत कामाला होते. “नेपच्यून पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडसाठी मी सिनेमाची फिल्मची रिळं वाहून न्यायचं काम करायचो,” ते सांगतात. “बॉम्बे, दिल्ली, मद्रासहून (३५ एमएमच्या रील्ससाठी) ऑर्डर येत असत. मोठ-मोठ्या ट्रंकांमध्ये फिल्म यायच्या मी त्या हावडाला घेऊन जायचो, त्यांचं वजन करायचो आणि वितरणासाठी त्यांना पुढे पाठवायचो.”
ती कंपनी बंद झाल्यावर दास बेरोजगार झाले. त्यावेळी ते दक्षिण कोलकात्यातील बोसपुकुर भागात भाड्याच्या घरात राहत होते. त्यांच्या शेजाऱ्याने त्यांना भंगारच्या धंद्याची ओळख करून दिली. “माझी नोकरी गेल्यावर त्याने मला त्याच्या कामात सामील होण्याबद्दल विचारले. तो म्हणाला, ‘मी तुला दररोज २५ रुपये देईन. तू सकाळी ८ वाजता घरातून बाहेर पडशील आणि दुपारपर्यंत घरी परत येशील. तुला सामान वाहून न्यावं लागेल आणि माझ्यासोबत फिरावं लागेल. आपल्याला सोबत चहा पिता येईल. मी राजी झालो. मी त्याच्याकडून शिकत गेलो. एखादा शिक्षक ज्याप्रमाणे त्याच्या विद्यार्थ्यांना शिकवतो त्याप्रमाणेच त्याने मला शिकवलं. तो माझा गुरु होता.”







