कित्येक शतकांपासून राजस्थानच्या पाली जिल्ह्यातल्या सादरी गावचे राइका उंट पाळत आले आहेत. मी फुयाराम राइकांसोबत चडिये किंवा चारणीला गेले. खरं तर हे दिवसभराचं काम असतं. फुयारामजी सकाळी घर सोडतात, सोबत चहाचं सामान आणि रोट्या मुंडाशात बांधून घेतात आणि सांजेला परत येतात. राजस्थानातला असह्य गरमा आणि २० उंटांवर देखरेख ठेवण्याचं काम असतानाही ते त्यांच्या चहात मलाही वाटेकरी करून घेतात.
फुयारामजींना कदाचित कल्पना असावी की त्यांच्या कुटुंबातलं कुणीच त्यांच्या पावलावर पाऊल टाकणार नाहीये. त्यांची मुलं कसं हे काम करणार नाहीत हे त्यांनी बोलून दाखवलं. आता पशुपालकांसाठी उरलेल्या मोजक्या काही गायरानांमधून जात असताना त्यांनी मला सांगितलं की कधी काळी राइका लोक सादरीच्या रानावनातून मुक्तपणे संचार करत आणि वाटेत भेटेल त्याच्याशी त्यांचे पक्के ऋणानुबंध जुळत असत.


