लीलाबाई मेमाणे आपल्या वीट-मातीच्या दोन खोल्यांच्या घरी निवांत बसल्या आहेत. त्यांच्या दोघी मुली त्यांच्याच शेजारी अभ्यास करतायत. दिवसातल्या १९ तास कामाच्या रगाड्यातले हे काही निवांत क्षण.
आठवड्याचे सहा दिवस सकाळी १० ते दुपारी २, लीलाबाई गावातल्या सरकारी अंगणवाडीत मुलांसाठी आणि गरोदर बायांसाठी आहार शिजवायचं काम करतात. अंगणवाडीला पोचण्याआधीच त्यांचं सात तास काम झालेलं असतं. आणि काम थांबतं ते थेट रात्री १० वाजता.
लीलाबाई पहाटे ३ वाजता उठतात, त्यांचं पहिलं काम म्हणजे दोन किलोमीटरवरच्या विहिरीवरून पाणी भरून आणायचं. “किमान २० हंडे पाणी लागतं, माझ्या लेकी मदत करतात,” लीलाबाई सांगतात. लीलाबाईंचे पतीही मदत करतात. सगळ्यांच्या मिळून विहिरीवर चार खेपा तरी होतात, ज्यात चार तास जातात.
पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातलं फळोदे हे त्यांचं गाव. मार्च ते जून या काळात इथे पाण्याची बोंब असते. एकूण ४६४ (जनगणना, २०११) लोकसंख्येच्या या महादेव कोळी आदिवासींचं बाहुल्य असणाऱ्या गावाची सगळी भिस्त एका विहिरीच्या पाण्यावर असते. जेव्हा ही विहीर कोरडी पडते तेव्हा पाण्यासाठी खाजगी टँकरशिवाय दुसरा पर्याय नसतो.







