लातुरात शाळा बंद झाल्यावर पारस माडीकरला जे वाटलं ते साधारण कोणत्याही ११ वर्षाच्या मुलाला वाटेल तसंच होतं. एक तर चौथीची परीक्षाच रद्द झाली त्यामुळे आता मोठ्ठी सुट्टी मिळणार असंच त्याच्या मनात होतं.
पण ते काही घडायचं नव्हतं. त्याच्या वडलांची, ४५ वर्षीय श्रीकांत यांची वाहनचालकाची नोकरी गेली आणि मग मिळेल ते काम करण्यावाचून – तिपटीने कमी पगार असला तरी – त्यांच्यापुढे काहीही पर्याय राहिला नाही. २५ मार्च रोजी देशभर संचारबंदी जाहीर झाली आणि त्याच्या आईचं, ३५ वर्षीय सरिता यांचं स्वयंपाकिणीचं कामही गेलं.
पारस सध्या दिवसाचा सकाळचा वेळ डोक्यावर पालेभाजीची टोपली घेऊन भाजी विकतोय. खेदाची बाब ही की तो ज्या दोन कॉलन्यांमध्ये भाजी विकतो त्यांची नावं सरस्वती आणि लक्ष्मी अशी आहेत. त्याची बहीण सृष्टी, वय १२ रामगर आणि सीतीराम नगर मध्ये भाजी विकतीये.
“दर रोज संध्याकाळी मान कसली दुखते तुम्हाला काय माहित? मी घरी गेलो ना आई तेलाने मालिश करून देते आणि गरम कपड्याने शेकते. मग दुसऱ्या दिवशी मी परत ओझं घेऊन बाहेर पडू शकतो,” लहानगा पारस कुरकुरतो. सृष्टीची अडचण आणखी वेगळीच आहे. “दुपार होऊतोवर माझ्या पोटात दुखायला लागतं,” ती सांगते. “जेवायआधी मी लिंबाचं सरबत करून पिते, मग जरा आराम पडतो.” या संचारबंदीच्या आधी दोघांपैकी कुणीच अंगमेहनतीचं असं काम केलं नव्हतं. आणि आता मात्र ते अतिशय कठीण काळात दोन पैसे कमावण्यासाठी रस्त्यावर आलेत. जास्तीची अपेक्षा सोडाच.



