“माझ्या लहानपणी लोक सांगायचे आपलं बेट एका मोठ्या प्रवाळावर आहे. खालच्या मोठ्या प्रवाळाने बेट उचलून धरलंय. आणि आमच्या चहुबाजूंचं खाऱ्या पाण्याचं सरोवर महासागरापासून आमचं संरक्षण करतं,” बित्रा बेटावर राहणारे ६० वर्षांचे मच्छीमार बी. हैदर सांगतात.

“आमच्या लहानपणी ओहोटीच्या वेळी आम्हाला प्रवाळ बघायला मिळायचं,” बित्राचेच आणखी एक मच्छीमार ६० वर्षीय अब्दुल खादर सांगतात. “फार सुंदर दिसायचं. आता मात्र फार काही राहिलेलंच नाहीये. या मोठ्या लाटा थोपवायला ते प्रवाळ गरजेचं आहे.”

लक्षद्वीप द्वीपसमूहांवरची परिस्थितिकी, उपजीविका, आयुष्यं आणि कहाण्या आणि कल्पनाविश्वाच्याही केंद्रस्थानी असणारं हे प्रवाळ हळू हळू झिजत चाललंय. इथल्या मच्छीमारांनी गेल्या काही दशकांमध्ये याशिवाय इतरही अनेक सारे बदल होताना पाहिलेत.

“साधी सरळ गोष्ट आहे. निसर्ग बदललाय,” अगात्तीचे ६१ वर्षीय मुनियामीन के. के. सांगतात. वयाच्या २२ व्या वर्षी त्यांनी मासेमारीला सुरुवात केली. “त्या काळात पाऊस बरोबर वेळेवर यायचा [जून महिन्यात] पण आता मात्र आम्हाला तो कधी येईल याची खात्री देता येत नाही. अलिकडे मासे पण कमी मिळतात. पूर्वी मासे धरण्यासाठी आम्हाला इतकं आतपर्यंत जावं लागत नसे. माशांचे थवे जवळच असायचे. पण आता मात्र लोक दिवस दिवस, कधी कधी तर अनेक आठवडे दर्यावर असतात, मासे शोधत.”

अगात्तीहून बित्रा बोटीने सात तासांच्या अंतरावर आहे. केरळच्या किनाऱ्याजवळ अरबी समुद्रात असलेली ही बेटं भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहेत. या बेटांवरच्या मच्छिमारांचं कसब वाखाणण्यासारखं आहे. लक्षद्वीप या शब्दाचा मल्याळम आणि संस्कृतमध्ये अर्थ होतो एक लाख बेटं. आपल्या आजच्या काळात इथे केवळ ३६ बेटं आहेत आणि तीही जास्तीत जास्त ३२ किलोमीटरच्या क्षेत्रात. पण या द्वीपसमूहांचं पाणी मात्र ४,००,००० चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलंय. सागरी जीव आणि सागरी संपत्तीने समृद्ध.

एकच जिल्हा असणाऱ्या या बेटांवरची दर सातवी व्यक्ती मच्छीमार आहे – ६४,५०० लोकसंख्येतल्या ९,००० हून जास्त जणांनी आपला हाच व्यवसाय असल्याचं सांगितलं आहे (जनगणना, २०११).

PHOTO • Sweta Daga

बित्रा (वरती) आणि लक्षद्वीपमधली इतर बेटं भारतातली एकमेव प्रवाळ बेटं आहेत. ‘आमच्या लहानपणी, ओहोटीच्या वेळी प्रवाळ दिसायचं [खाली उजवीकडे],’ बित्रात मच्छीमार असणारे अब्दुल खादर सांगतात (खाली डावीकडे). ‘आता मात्र त्यातलं फार राहिलेलं नाही’

बेटावरची जुनी जाणती माणसं आम्हाला सांगतात की कधी काळी ते पावसाप्रमाणे त्यांचं नियोजन ठरवायचे. पण, “आता समुद्र कधी पण उफाणतो – सध्या सगळं असंच झालंय,” गेली ४ दशकं मासेमारी करणारे ७० वर्षांचे यू. पी. कोया सांगतात. “मी पाचवीत असेन, मिनिकॉय बेटांवरच्या [इथून ३०० किलोमीटर] लोकांनी इथे येऊन आम्हाला आकडा टाकून मासे धरायला शिकवलं होतं. तेव्हापासून, लक्षद्वीपमध्ये आम्ही शक्यतो तसेच मासे धरतो – आम्ही जाळी वापरत नाही कारण ती प्रवाळात अडकतात आणि त्यामुळे प्रवाळ तुटतं. मासे शोधायला पक्ष्यांची मदत होतेच पण आमच्याकडे होकायंत्रं आहेत त्यांचाही उपयोग होतो.”

अशा प्रकारच्या मासेमारीमध्ये मच्छीमार त्यांच्या जहाजांच्या कठड्यावर किंवा खास उभारलेल्या कट्ट्यांवर उभे राहतात. एक छोटी, मजबूत दोरी आणि तिला खाली पक्का आकडा किंवा गळ अडकवलेला असतो. ही दोरी एका खांबाला बांधलेली असते. बहुतेक वेळा हा खांब फायबर ग्लासचा बनवलेला असतो. मासे धरायची ही शाश्वत पद्धत आहे. समुद्राच्या पाण्यात वरच्या भागात पोहणाऱ्या ट्यूना माशांच्या थव्यांमधले मासे धरण्यासाठी ही पद्धत खासकरून वापरली जाते. अगात्ती आणि लक्षद्वीपच्या इतर बेटांवर नारळ आणि मासे – तेही बहुतेक वेळा ट्युना – हेच जेवणाचा अविभाज्य भाग आहेत.

या द्वीपसमूहांमध्ये बित्रा हे सर्वात छोटं – ०.१०५ चौ. किमी. आणि सुमारे १० हेक्टर क्षेत्रफळ असणारं – आणि सर्वात दूर असणारं बेट आहे. इथल्या पुळणीवर मऊशार, शुभ्र रेती आहे, सभोवती नारळाची झाडं आणि समुद्राचं पाणीही चार छटांचं – अस्मानी, मोरपंखी, निळसर हिरवा आणि समुद्री हिरवा. इथे पर्यटकांना प्रवेश नाही आणि जर तुम्ही इथे आलात तर फिरण्यासाठी चालणं हाच एकमेव मार्ग. इथे दुचाकी किंवा चारचाकी गाड्या नाहीत, सायकलीही दुर्मिळच. २०११ सालच्या जनगणनेमध्ये इथे फक्त २७१ रहिवाशांची नोंद झाली आहे.

मात्र लक्षद्वीपावरचं सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर इथे आहे – ४७ चौ. किमी क्षेत्र असणारं. बित्रा आणि लक्षद्वीप हे भारतातलं एकमेव प्रवाळाचं बेट आहे. म्हणजेच, इथे मानवी वस्ती असलेलं सगळं क्षेत्र हे खरं तर प्रवाळ कंकण आहे. आणि इथली रेती-माती देखील प्रवाळांचीच तयार झालेली आहे.

प्रवाळ हे खरं तर जीव आहेत जे समुद्राखाली त्यांच्या वसाहती म्हणजेच या भिंती तयार करतात. सागरी जीवांसाठी, त्यातही माशांसाठी ही सर्वोत्तम परिसंस्था आहे. प्रवाळ भिंती समुद्र उफाणला तर त्यापासून बेटांचं रक्षण करणारे नैसर्गिक अडथळ्यांचं काम करतात. या भिंतींमुळे इथे मुळातच कमी असणाऱ्या गोड्या पाण्याच्या स्रोतांमध्ये खारं पाणी मिसळत नाही.

बेसुमार मासेमारी, खास करून समुद्राचा तळ ढवळून काढणारी जाळी वापरणाऱ्या मोठ्या ट्रॉलर्समुळे गळाला लावायच्या माशांच्या संख्येत मोठी घट होते, प्रवाळभिंती आणि संबंधित जैवविविधतेचं नुकसान होतं

व्हिडिओ पहाः गळाला लावायचे मासे पकडण्यासाठी नावेत

या प्रवाळभिंतींमध्ये ट्यूना आणि खाऱ्या पाण्याच्या सरोवरातल्या इतर माशांना पकडण्यासाठी आमिष म्हणून वापरण्यात येणारे छोटे मासे राहतात. २०१२ साली यूएनडीपीने तयार केलेल्या लक्षद्वीपसाठीच्या वातावरणबदलासंबंधी कृती आराखड्यामध्ये नमूद केलंय की भारतातल्या एकूण मासळीपैकी २५ टक्के मासळी या समृद्ध, प्रवाळ बेटांमधून येते. ट्यूना पकडण्यासाठी तर गळाला लावायचे मासे फार महत्त्वाची भूमिका निभावतात.

“आम्ही गळाला लावायच्या माशांनी अंडी घातल्यानंतरच त्यांना पकडायचो. पण आता मात्र लोक कधीही शिकार करतात,” ५३ वर्षीय अबदुल रहमान सांगतात. बित्राहून १२२ किलोमीटरवर असलेल्या जिल्ह्याचं ठिकाण असणाऱ्या कावरत्तीमध्ये ते गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ मासेमारी करतायत. “होड्यांची संख्या वाढलीये, पण मासळी मात्र कमी झालीये.” बेसुमार मासेमारी, खास करून समुद्राचा तळ ढवळून काढणारी जाळी वापरणाऱ्या मोठ्या ट्रॉलर्समुळे गळाला लावायच्या माशांच्या संख्येत मोठी घट होते, प्रवाळभिंती आणि संबंधित जैवविविधतेचं नुकसान होतं.

खरी समस्या याहून मोठीच आहे.

एल निनोसारख्या काही वातावरणीय घटकांमुळे समुद्राचं तापमान वाढतं आणि मोठ्या प्रमाणावर प्रवाळांचा ऱ्हास (coral bleaching) होतो – प्रवाळाचा रंग उडतो आणि जीव नष्ट होतो आणि त्यामुळे ते बेटांचं रक्षण करू शकत नाहीत. आतापर्यंत लक्षद्वीप बेटांवर तीनदा याप्रकारे प्रवाळ ऱ्हास झाला आहे – १९९८, २०१० आणि २०१६. नेचर कॉन्झर्वेशन फौंडेशन या ना-नफा तत्त्वावर काम करणाऱ्या मैसुरुस्थित वन्यजीव संरक्षण आणि संशोधन संस्थेने  २०१८ साली केलेल्या अभ्यासात असं दिसतं की या प्रवाळ भिंती धोक्यात आहेत. या अभ्यासात असंही दिसून आलं की लक्षद्वीप बेटांवर असणारं प्रवाळाचं प्रत्यक्ष आवरण २० वर्षांत म्हणजेच १९९८ साली ५१.६ टक्क्यांवरून २०१७ साली ११ टक्के इतकं खालावलं आहे.

बित्राचा ३७ वर्षीय मच्छीमार अब्दुल कोया सांगतो­: “आम्ही ४-५ वर्षांचे होतो ना, तेव्हा आम्ही प्रवाळ ओळखू शकायचो. आम्ही पाण्यात जायच्या आधीच प्रवाळ किनाऱ्यावर वाहत यायचं. आम्ही आमची घरं बांधायला ते वापरायचो.”

कावरत्तीमध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विभागात शास्त्रज्ञ असणारे डॉ. के. के. इद्रिस बाबू प्रवाळाचा ऱ्हास का होतोय ते समजावून सांगतातः “समुद्राचं वाढलेलं तापमान आणि प्रवाळ भिंतींचा परस्परांशी संबंध आहे. २०१६ साली, समुद्राचं तापमान ३१ अंश सेल्सियस किंवा त्याहूनही जास्त होतं!” अभ्यास असं दाखवतात की २००५ पर्यंत या भिंतींचं तापमान २८.९२ अंश सेल्सियस होतं. १९८५ साली ते २८.५ अंश होतं. पाण्याच्या तापमानातली आणि समुद्राच्या पातळीतली वाढ ही बेटांसाठी निश्चितच चिंतेची बाब आहे कारण इथे ही वाढ समुद्रपातळीपेक्षा १-२ मीटर इतकी आहे.

PHOTO • Rohan Arthur, Nature Conservation Foundation, Mysuru

वरच्या रांगेतः एल निनोसारख्या काही वातावरणीय घटकांमुळे समुद्राचं तापमान वाढतं आणि मोठ्या प्रमाणावर प्रवाळांचा ऱ्हास होतो - प्रवाळाचा रंग उडतो आणि जीव नष्ट होतो आणि त्यामुळे ते बेटांचं रक्षण करू शकत नाहीत. खालच्या रांगेतः २०१४ सालची पावोना क्लॉवस प्रवाळाची मोठी शाखा, प्रवाळभिंतींमध्ये राहणाऱ्या माशांसाठी स्वर्ग असलेली ‘पोटॅटो पॅच’ नावाने ओळखली जाणारी परिसंस्था. पण २०१६ साली एल निनोच्या प्रभावामुळे समुद्राचं तापमान वाढलं आणि प्रवाळांमधल्या पॉलिप्सनी त्यांच्यावर जगणारं परजीवी शेवाळं झटकून टाकलं आणि ती पांढरी झाली

कावरत्तीतली सर्वात मोठ्या - ५३ फूट लांब – बोटीचे मालक असणाऱ्या ४५ वर्षीय निजामुद्दिन के. यांनाही हे बदल जाणवायला लागले आहेत. पारंपरिक ज्ञानही विरत चालल्यामुळे त्यांच्या समस्या दुणावल्या आहेत. “माझे वडील मच्छीमार होते. त्यांना मासळी कुठे असते ते माहित असायचं, [त्या पिढीकडे] माहिती असायची. आमच्याकडे ते ज्ञान नाही त्यामुळे आमची सगळी भिस्त [मासे एक ठिकाणी आणणाऱ्या] यंत्रावर असते. मग आम्हाला ट्युना मिळाला नाही की आम्ही सरोवरातले इतर मासे धरतो.” मासे गोळा करणारी यंत्रं असं एकदम भारी नाव असणारी यंत्रं म्हणते एखादा साधा तराफा किंवा वाहणारा ओंडका असू शकतो – ज्याच्या खाली किंवा भोवती मासे गोळा होतात.

“सध्या,” गेली २० वर्षं लक्षद्वीपमध्ये समुद्री जीवशास्त्रज्ञ आणि शास्त्रज्ञ म्हणून काम करणारे डॉ. रोहन आर्थर म्हणतात, “मला खरी चिंता प्रवाळ भिंतींच्या जैवविविधतेची नाहीये, मला त्यांच्या उपयोगितेबद्दल जास्त प्रश्न पडलेत. इथल्या लोकांचं जिणं या प्रवाळावर अवलंबून आहे. या भिंतींचा संबंध फक्त प्रवाळाशी नाही.”

मैसुरुच्या एनसीएफमध्ये सागर आणि सागरी किनारा कार्यक्रमाचे प्रमुख असणारे डॉ. आर्थर कावरत्तीमध्ये आम्हाला सांगत होते की, “लक्षद्वीपच्या प्रवाळभिंतींमध्ये तगून राहण्याची क्षमता दिसली आहे, मात्र वातावरणातील बदलांचा वेग पाहता त्यांचा नुकसान भरून काढण्याचा वेग पुरेसा नाहीये. अतिरेकी मासेमारीसारख्या मानवी हस्तक्षेपांचा तणाव लक्षात घेतला नाही तरी हे दिसून येतंय.”

वातावरणातील प्रक्रिया आणि घटनांचे प्रवाळांच्या ऱ्हासाशिवाय इतर वेगळे परिणाम देखील आहेत. २०१५ सालचं मेघ आणि २०१७ सालचं ओखी या दोन्ही चक्रीवादळांनी लक्षद्वीप बेटांना झोडपून काढलं. मत्स्यविभागाच्या आकडेवारीवरून दिसतं की मासळीमध्ये २०१६ साली २४,००० टनांवरून (ट्यूनाचे वेगवेगळे प्रकार) २०१७ साली फक्त १४,००० टन इतकी घट झाली आहे. २०१८ साली २४,००० टन मासळी घावली, ती २०१९ साली १९,५०० टनांवर आली. काही वर्षी चांगली आवकही झाली. पण मच्छिमारांच्या म्हणण्याप्रमाणे ही सगळी प्रक्रिया खूपच लहरी आणि बेभरवशाची झाली आहे.

गेल्या एका दशकामध्ये जगभरात प्रवाळभिंतींमधल्या मासळीला असलेली मागणी वाढली असल्यामुळे, मच्छीमारही, स्थानिक लोक ज्याला चम्मम म्हणतात, त्या मोठ्या भक्षक माशांच्या शोधात असतात.

PHOTO • Sweta Daga

डावीकडेः ‘होड्यांची संख्या वाढलीये पण मासळी कमी झालीये’, कावरत्ती बेटांवरचे मच्छीमार ट्यूना मासा पकडून आणताना सांगतात. उजवीकडेः बित्रावरती अब्दुल कोया त्याला घावलेली मासळी वाळत घालतोय

अगात्ती बेटांवरचे उम्मर एस, वय ३९ गेल्या १५ वर्षांपासून मासे धरतायत आणि होड्या बांधतायत. मच्छीमार आता भक्षक माशांच्या शोधात असण्याचं कारण ते सांगतात, “पूर्वी या सरोवरापाशीच किती तरी ट्यूना मासे असायचे. पण आता आम्हाला ते धरायलाही इथून ४०-४५ मैल आत जावं लागतंय. आणि इतर बेटांवर जावं लागलं तर मग दोन आठवड्याचा काळ जातो. असं झालं की मी तेव्हाच चम्मम पकडतो. त्यांच्यासाठीही बाजारपेठ आहेच. ते जरा किचकट काम आहे, आणि फक्त एखादा मासा पकडायलाही तासभर वाट पहावी लागू शकते.”

या क्षेत्रात होणाऱ्या बदलांचा मागोवा घेणारी शास्त्रज्ञ, ऋचा करकरे बित्रामध्ये आम्हाला सांगते, “गेल्या काही वर्षांत भक्षक माशांची संख्या कमी होत चाललीये, प्रवाळांचं स्वास्थ्यही याच काळात खालावत गेलंय. आणि ही सगळी अनिश्चितता आणि वातावरणातल्या बदलांचा मुकाबला करण्यासाठी ट्यूना मिळाला नाही की मच्छीमार प्रवाळभिंतींमधल्या माशांची शिकार करतात. त्यामुळे त्यांची संख्या आणखी खालावत जातीये. महिन्यातले पाच दिवस जेव्हा ते अंडी घालतात त्या काळात मासेमारी करू नका असा सल्ला आम्ही त्यांना देतोय.”

बित्राच्या मच्छीमारांनी त्या काळात मासेमारी थांबवूनही पाहिली, पण बाकीच्यांची काही तशी तयारी दिसली नाही.

“किलतन बेटांवरून मुलं इथे यायची आणि रात्री मासे धरायची,” अब्दुल कोया सांगतो. तो सुकवलेले मासे वेगवेगळे करतोय. “हे थांबवायला पाहिजे... हे चालूच आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे गळाला लावायचे, प्रवाळ भिंतींमधले आणि ट्यूना असे सगळे मासे कमी होत चाललेत.”

“भारतातून, अगदी इतर देशांतूनही मोठ्या बोटी येतात, मोठमोठी जाळी असलेल्या,” बित्रा पंचायतीचे अध्यक्ष असलेले बी. हैदर सांगतात. “आमच्या छोट्या बोटी घेऊन आम्ही त्यांच्याशी स्पर्धा करूच शकत नाही.”

दरम्यानच्या काळात हवामान आणि वातावरणातले बदल जास्तीच लहरी व्हायला लागलेत. “वयाच्या चाळिशीपर्यंत मला केवळ दोन चक्रीवादळं आलेली आठवतायत,” हैदर सांगतात. “पण गेल्या काही वर्षांत त्यांची संख्या वाढलीये आणि वादळात या प्रवाळभिंतींचं नुकसान होतंय.”

PHOTO • Sweta Daga

डावीकडेः ‘आम्ही गळाला लावायच्या माशांनी अंडी घातली की नंतरच त्यांना पकडायचो. पण आता मात्र लोक कधीही शिकार करतात,’ कावरत्ती बेटावरचे मच्छीमार, ५३ वर्षीय अब्दुल रहमान सांगतात. उजवीकडेः कावरत्तीवरची सर्वात मोठ्या बोटीचे मालक, निजामुद्दिन के. यांना देखील बदल जाणवत आहेत

कावरत्तीमध्ये चक्रीवादळांचा काय परिणाम होतोय हे कावरत्तीचे अब्दुल रहमानदेखील सांगतात. “पूर्वी आम्हाला प्रवाळाच्या भिंतींपाशीच स्किपजॅक ट्यूना दिसायचा, पण ओखीनंतर चित्रच पार बदलून गेलंय. नव्वदच्या दशकात आम्हाला सागरात ३-४ तास गेलं तरी पुरे होतं. आमच्याकडे यंत्रं नव्हती, पण मासळीच इतकी असायची की आमचं काम झटपट व्हायचं. आता आम्हाला पूर्ण दिवस किंवा कधी कधी जास्त काळ दर्यावर घालवावा लागतो. आम्हाला प्रवाळातल्या माशांची शिकार करायची नाहीये. पण ट्यूनाच मिळाला नाही तर आम्हालाही कधी कधी तिथले मासे धरावे लागतात.”

रहमान आणखी एक गोष्ट सांगतात. “बोटींची संख्या – आणि त्याही आकाराने मोठाल्या – वाढलीये. मासळी मात्र कमी झालीये, त्यामुळे आमचा मासेमारीचा खर्चही वाढलाय.”

मच्छीमारांच्या कमाईचा हिशोब लावणं सोपं नाही कारण दर महिन्याला ती कमी-जास्त होत असते, डॉ. आर्थर सांगतात. “त्यातले अनेक जण इतर नोकऱ्याही करतात. त्यामुळे फक्त मासेमारीतून किती उत्पन्न येतं हे सांगणं अवघड जातं.” पण हे तर उघडउघड दिसतंय की “गेल्या दहा वर्षांत उत्पन्नात खूपच चढ-उतार झाले आहेत.”

त्यांच्या मते, “लक्षद्वीपमध्ये एकाच वेळी दोन मोठे बदल घडतायत, वातावरण बदलांमुळे प्रवाळ भिंतींचं नुकसान आणि त्याचा मासळीवर परिणाम होतोय आणि त्यातून मच्छीमार आणि त्यांच्या उपजीविकेवर [परिणाम होतोय]. तरीही लक्षद्वीपमध्ये ‘आशेचा किरण’ मानता येईल असं काही घडवून आणण्याची क्षमता आहे. आपण जर सागरी जैवसंपदेचं रक्षण केलं आणि त्यातून प्रवाळभिंतींना पुनरुज्जीवित होण्याची संधी दिली, तर मग दीर्घकाळ त्या तगून राहण्याती शक्यता आपण निर्माण करू शकतो.”

तिथे कावरत्तीमध्ये मात्र निजामुद्दिन के. मात्र कुरकुर करतात. “वीस वर्षांपूर्वी इतकी मासळी होती की ४-५ तासात आमचं काम उरकायचं, पण आता बोट भरण्यासाठी अख्खा दिवस जातो. पावसाळ्याचं तंत्र बदललंय. कधी पाऊस येईल तेच सांगता येत नाही. मासेमारीच्या काळातही समुद्र उफाणलेला असतो. आम्ही आमच्या बोटी जून महिन्यातच किनाऱ्यावर आणून ठेवायचो – हे खूप कष्टाचं काम आहे – कारण तेव्हाच पावसाला सुरुवात व्हायची. पण त्यानंतर कधी कधी महिनाभर पाऊस येत नाही. मग काय आमच्या बोटी तिथेच किनाऱ्यावर उभ्या. त्या तिथनं हलवायच्या का वाट पहायची ते आम्हालाही समजत नाही. त्यामुळे आम्ही पण अडकून पडलोय.”

साध्यासुध्या लोकांचं म्हणणं आणि स्वानुभवातून वातावरण बदलांचं वार्तांकन करण्याचा देशपातळीवरचा पारीचा हा उपक्रम संयुक्त राष्ट्रसंघ विकास प्रकल्पाच्या सहाय्याने सुरू असलेल्या उपक्रमाचा एक भाग आहे

हा लेख पुनःप्रकाशित करायचा आहे? कृपया zahra@ruralindiaonline.org शी संपर्क साधा आणि namita@ruralindiaonline.org ला सीसी करा

अनुवादः मेधा काळे

Reporter : Sweta Daga

Sweta Daga is a Bengaluru-based writer and photographer, and a 2015 PARI fellow. She works across multimedia platforms and writes on climate change, gender and social inequality.

यांचे इतर लिखाण श्वेता डागा
Editor : P. Sainath
psainath@gmail.com

पी. साईनाथ पीपल्स अर्काईव्ह ऑफ रुरल इंडिया - पारीचे संस्थापक संपादक आहेत. गेली अनेक दशकं त्यांनी ग्रामीण वार्ताहर म्हणून काम केलं आहे. 'एव्हरीबडी लव्ज अ गुड ड्राउट' (दुष्काळ आवडे सर्वांना) आणि 'द लास्ट हीरोजः फूट सोल्जर्स ऑफ इंडियन फ्रीडम' (अखेरचे शिलेदार: भारतीय स्वातंत्र्यलढ्याचं पायदळ) ही दोन लोकप्रिय पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत.

यांचे इतर लिखाण साइनाथ पी.
Series Editors : P. Sainath
psainath@gmail.com

पी. साईनाथ पीपल्स अर्काईव्ह ऑफ रुरल इंडिया - पारीचे संस्थापक संपादक आहेत. गेली अनेक दशकं त्यांनी ग्रामीण वार्ताहर म्हणून काम केलं आहे. 'एव्हरीबडी लव्ज अ गुड ड्राउट' (दुष्काळ आवडे सर्वांना) आणि 'द लास्ट हीरोजः फूट सोल्जर्स ऑफ इंडियन फ्रीडम' (अखेरचे शिलेदार: भारतीय स्वातंत्र्यलढ्याचं पायदळ) ही दोन लोकप्रिय पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत.

यांचे इतर लिखाण साइनाथ पी.
Series Editors : Sharmila Joshi

शर्मिला जोशी पारीच्या प्रमुख संपादक आहेत, लेखिका आहेत आणि त्या अधून मधून शिक्षिकेची भूमिकाही निभावतात.

यांचे इतर लिखाण शर्मिला जोशी
Translator : Medha Kale
mimedha@gmail.com

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.

यांचे इतर लिखाण मेधा काळे