चूक होऊन चालणार नाही, सिराज मोमीन पक्कं जाणतात. जरा जरी चूक झाली तरी मीटरमागे मिळणारे २८ रुपयेही हातचे जायचे. उभ्या म्हणजेच ताण्याच्या आणि आडव्या म्हणजेच बाण्याच्या धाग्यांची संख्या बदलता कामा नये. त्यामुळे ते अधून मधून भिंगातून वीण निरखत राहतात. आणि सहा तासांच्या त्यांच्या कामात एका मिनिटात ९० वेळा हातमागाच्या दोन पावड्या चालवतात – म्हणजेच दिवसातून ३२,४०० वेळा. त्यांच्या पायाच्या हालचालींमुळे माग उघडतो, आयताकृती चौकटीतल्या ३,५०० तारांची फणी पहायला मिळते (प्रत्येक मागामध्ये ही संख्या वेगवेगळी असते). पायाच्या संयत हालचालीतून धातूच्या रुळाला गुंडाळलेला उभा धागा या फणीतून पुढे जातो. आणि त्यातूनच, एका इंचात आडवे आणि उभे प्रत्येकी ८० धागे असणारं कापड विणलं जातं – एका तासात एक मीटर.
आता ७२ वर्षांचे असलेले सिराज गेल्या ५० वर्षांपासून, वयाच्या १५ व्या वर्षापासून हे काम करतायत. त्यांचा माग मात्र त्यापेक्षा दुप्पट वयाचा आहे. शंभराहून जास्त वर्षं जुन्या सागाच्या लाकडापासून बनवलेला त्यांच्या कुटुंबातला हा पिढीजात माग. याच मागावर गेली ५७ वर्षं सिराज वस्त्रं विणतायत – हातमागावरचं काम कौशल्याचं काम आहे. धागा निरखत, हात आणि पायाची हालचाल तालात करत विणल्या जाणाऱ्या वस्त्रामध्ये उभे आणि आडवे धागे जितके हवे तितकेच राखणं हे साधं काम नाही.
सिराज यांच्या घरी सध्या दोनच हातमाग आहेत, दोन्ही सात फूट उंच. कधी काळी त्यांच्याकडे सात माग होते आणि त्यावर काम करण्यासाठी कामगार होते. “१९८० च्या दशकात खूप काम असायचं,” ते म्हणतात. तीस वर्षं झाली, त्यांनी दुसऱ्या गावातल्या खरीरदारांना १,००० रुपयांना एकेक माग विकून टाकला आणि काही काळाने कोल्हापूर शहरातल्या एका सामाजिक संस्थेला दोन माग दान देऊन टाकले.
कोल्हापूर जिल्ह्याच्या हातगकणंगले तालुक्यातल्या रेंदाळमध्ये (लोकसंख्या १९,६७४, जनगणना, २०११) सिराज यांचं कुटुंब गेल्या तीन पिढ्यांपासून या मागावर बसून वस्त्र विणतंय. १९६२ साली आठवी पास झाल्यानंतर सिराज यांनी आपली आत्या, हलीमा यांच्याकडून विणकामाची कला आत्मसात केली. रेंदाळमधल्या काही मोजक्या विणकर स्त्रियांपैकी त्या एक. गावातल्या बाकी बाया बाण्यासाठी लागणारा धागा हाताने कातायचं काम करतात – काही वर्षांनंतर सिराज यांच्या पत्नी मैमुना देखील हेच काम करू लागल्या.















