ब्याऐंशी वर्षांच्या बापू सुतारांना १९६२ मधला तो दिवस आजही स्पष्ट आठवतो. एक लाकडी हातमाग त्या दिवशी त्यांनी विकला होता. स्वतःच्या कारखान्यात, स्वतःच्या हाताने तयार केलेला. सात फूट उंचीच्या, पायाने चालवण्याच्या या हातमागाचे त्यांना वट्ट ४१५ रुपये मिळाले होते. कोल्हापूरच्या सनगाव कसबा गावातल्या एका विणकराने तो घेतला होता.
या आठवणीने त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं असतं. पण तसं नाहीये. कारण हाच हातमाग त्यांनी बनवलेला शेवटचा हातमाग ठरला. त्यानंतर अशा हातमागांना मागणीच येईनाशी झाली, हाताने बनवलेले हातमाग कोणी घेईना. “त्यावेळी सगळं मोडलं…” बापू सांगतात.
आज, बापू त्यांच्या गावातले लाकडी हातमाग बनवणारे शेवटचे कारागीर आहेत. पण कोल्हापूरच्या त्यांच्या रेंदाळमध्ये फार कोणालाच हे माहीत नाही. कोणे एके काळी बापू आणि त्यांचं कौशल्य यांना प्रचंड मागणी होती, याचीही कोणाला कल्पना नाही. ‘‘रेंदाळ आन् आसपासच्या गावांमधले हातमाग बनविणारे कुणीच हयात नाही आता. सगळे गेले,” वसंत तांबे सांगतात. पंच्याऐंशी वर्षांचे तांबे गावातले सगळ्यात वयस्कर विणकर आहेत.
लाकडापासून हातमाग बनवण्याचं कौशल्यही आता रेंदाळ गावातून लुप्त झालंय. “मी विकलेला तो शेवटचा हातमागही अस्तित्वात नाहीये आता,” शक्य तितक्या मोठ्याने बोलत बापू सांगतात. त्यांच्या छोट्याशा घराच्या आसपास बरेच यंत्रमाग चालत असतात अणि त्यांचा आवाज वातावरणात सतत भरून राहिलेला असतो. त्या आवाजातून आपला आवाज माझ्यापर्यंत पोहोचावा, यासाठी बापूंची धडपड चाललेली असते.
घरातल्या घरात असलेल्या बापूंच्या पारंपरिक कारखान्याने एक अख्खं युग पाहिलंय. त्यांच्या कारखान्यात तपकिरी रंगाच्या अनेक छटा असतात…. गडद, फिका, सेपिया, थोडा नारिंगीकडे जाणारा, शिसवी…. अशा अनेक. पण आता हा रंग उडत चाललेला असतो. त्याची चकाकी लुप्त झालेली असते.

























