रिटा अक्कांकडे पाहिलं की जीवन आपल्याला काय शिकवू पाहतं ते समजतं– आणि ते हे की जगण्याला एक हेतू असतो. या अपंग सफाई कामगार (त्यांना ऐकू किंवा बोलता येत नाही) विधवा आहेत, त्यांची मुलगी १७ व्या वर्षी तिच्या आजीबरोबर घर सोडून गेली. ४२ वर्षीय रिटाअक्कांच्या आयुष्यावर एकटेपणाचं सावट असलं तरीही त्या एकाकी पडणार नाहीत.
रोज सकाळी उठून रिटा अक्का – त्यांच्या वस्तीतील सगळे जण त्यांना या नावाने ओळखतात (काहीजण त्यांना ऊमाची, बोलू न शकणाऱ्यांसाठी वापरण्यात येणारा अवमानकारक शब्द, अशी हाक मारतात) – चेन्नई महानगर पालिकेत आपल्या कचरा गोळा करण्याच्या कामावर नेमाने जातात. मात्र कधीकधी त्या दिवसभराच्या कष्टातून अंग दुखत असल्याची त्यांची तक्रार असते. त्यांनी आपल्या कचरा गोळा करणाऱ्या खास हातगाडीच्या बाजूवर पाहिलं, की त्यांची आपल्या कामावरील निष्ठा दिसून येते. त्यांनी त्यावर आपलं नाव तीनदा गिरवलंय – तीन वेगवेगळ्या रंगांत. दिवसा अखेरीस त्या शहरातील कोट्टुरपुरम या भागात हाउसिंग बोर्ड क्वार्टरमधल्या आपल्या लहानशा, रिकाम्या घरी परत जातात.




























