“कसा आहेस बाळा? काय करतोयस? हे सगळं किती दिवस चालणारे?” चेनाकोंडा बालसामी त्यांच्या मुलाला फोनवर विचारतात. “लई कडक केलंय का? आपल्याकडं पोलिस आले होते? लोकं [शेतमजूर] कामाला चाललीत का?”

दिवाळीनंतर नोव्हेंबर महिन्यात बालसामींनी इतर चार मेंढपाळांसोबत तेलंगणाच्या वानपार्थी जिल्ह्यातील आपलं गाव केठेपल्ले सोडलं. त्यांच्याकडे सुमारे १००० शेरडं आणि मेंढरं राखायला आहेत (यातली त्यांच्या मालकीची कोणतीच नाहीत), आणि तेव्हापासून ते जितराबाला चाऱ्याच्या शोधात भटकंती करतायत.

ते आणि इतर मेंढपाळ – सगळे यादव तेलंगणातील ओबीसी प्रवर्गात मोडणाऱ्या जातीचे आहेत. २३ मार्च रोजी ते सगळे केठेपल्लेपासून १६० किलोमीटरवर कोप्पोले गावी पोचले होते. त्यानंतर दोनच दिवसांत अख्ख्या देशभरात कोविड-१९ चा संसर्ग होऊ नये म्हणून संचारबंदी लागू करण्यात आली.

नलगोंडा जिल्ह्याच्या गुर्रुमपोडे मंडलातल्या कोप्पोलेमध्ये संचारबंदी लागल्यानंतर त्यांना डाळ-तांदूळ, भाजीपाला आणि इतर सामान विकत घेणं अवघड व्हायला लागलंय. आणि ते आता रोज थोडं थोडं सामान खरेदी करतायत.

सार्वजनिक वाहतूक ठप्प पडल्यामुळे आणि संचारबंदी कधी उठेल याची काही खात्री नसल्यामुळे आपल्या जितराबासाठी औषधं घेणं, नेहमीसारखं मधूनच आपल्या घरी चक्कर मारून येणं, मोबाइल फोन रिचार्ज करणं आणि आपल्या जितराबासाठी नवी गायरानं शोधणं हे सगळंच अवघड – त्यांच्या मते अशक्य – होऊन बसलंय.

Chenakonda Balasami (left), his brother Chenakonda Tirupatiah (right) and other herdsmen have been on the move since November, in search of fodder for the animals – that search cannot stop, neither can they move during the lockdown, nor can they return home
PHOTO • Harinath Rao Nagulavancha
Chenakonda Balasami (left), his brother Chenakonda Tirupatiah (right) and other herdsmen have been on the move since November, in search of fodder for the animals – that search cannot stop, neither can they move during the lockdown, nor can they return home
PHOTO • Harinath Rao Nagulavancha

चेनाकोंडा बालसामी (डावीकडे), त्यांचे भाऊ चेनाकोंडा तिरुपतय्या (उजवीकडे) आणि इतर पशुपालक नोव्हेंबरपासून आपलं जितराब घेऊन चारणीला बाहेर पडलेत – चाऱ्याचा शोध अंतहीन आहे, आणि आता सगळा देश संचारबंदीत असल्यामुळे धड त्यांना घरीही जाता येत नाहीये ना चारणीला जाता येतंय

“गावात राहणाऱ्यांना हे [असं इतरांपासून दूर राहणं] जमू शकतं. आमच्यासारख्या भटकंती करणाऱ्यांनी असल्या स्थितीत काय करावं?” बहुधा पन्नाशीला टेकलेले बालासामी विचारतात.

“आम्हाला भाजीपाला घ्यायला सुद्धा गावात येऊ देत नाहीयेत,” बालासामींचे भाऊ असलेले चेनाकोंडा तिरुपतय्या सांगतात. तेही पशुपालक आहेत.

नशिबाने, ज्या शेतात त्यांनी जितराब बसवलंय, त्याचा मालक त्यांना डाळ, तांदूळ आणि भाजीपाल्यासाठी मदत करतोय.

पण थोड्याच दिवसांत त्यांना दुसरं गायरान शोधावं लागणार आहे. “आम्ही चार दिवस झालं, इथे आलोय,” तिरुपतय्या सांगतात. “इथे जास्त काही चारा नाही. आम्हाला दुसरं ठिकाण शोधावं लागणार.”

पशुपालकांची ही पायी भटकंती कायमच खडर असते – आणि आता ती जास्तच कठीण बनलीये. चारा आणि गायरानांच्या शोधात अनेक किलोमीटर अंतर पायी तुडवायचं त्यानंतर जमीन मालकाशी सौदा करायचा. जिथे मुळातच रिकामी रानं कमी आहेत आणि जिथे शेतकऱ्यांनी स्वतःच्या जितराबासाठी गायरानं राखून ठेवलीयेत तिथे तर हे आणखीच अवघड बनतं. आणि आता तर वाहतूक आणि प्रवासावर मर्यादा आल्यामुळे या पशुपालकांसाठी चाऱ्याचा शोध दुस्तर बनला आहे.

Left: Avula Mallesh and the other herders are not being allowed into the village to buy vegetables. Right: Tirupatiah preparing a meal with the rice, dal and vegetables given by the owner of the land where the flock was grazing
PHOTO • Harinath Rao Nagulavancha
Left: Avula Mallesh and the other herders are not being allowed into the village to buy vegetables. Right: Tirupatiah preparing a meal with the rice, dal and vegetables given by the owner of the land where the flock was grazing
PHOTO • Harinath Rao Nagulavancha

डावीकडेः अवुला मल्लेश आणि इतर पशुपालकांना गावात भाजीपाला आणायला बंदी करण्यात आली आहे. उजवीकडेः ज्या रानात जितराब बसवलंय तिथल्या मालकाने दिलेलं डाळ-तांदूळ आणि भाजीपाला घेऊन तिरुपतय्या स्वयंपाक रांधतायत

“आम्हाला मोटार सायकलवर पण जाता येत नाहीये,” बालासामी सांगतात. कधी कधी त्यांच्या गावातले लोक मोटार सायकलींवर त्यांच्यापर्यंत येतात आणि त्यांना परत गावी घेऊन जातात किंवा चारा मिळेल अशा ठिकाणी त्यांना सोडून येतात. ­“[गाड्यांवर चाललेल्या] लोकांना [पोलिस] लई मारतायत असं ऐकलं आम्ही,” बालासामी सांगतात. त्यांच्या फोनवर तसे व्हिडिओ आले होते.

या आठवड्यात आपल्या गावी परतायचा बालासामींचा विचार होता. त्यांचं गाव पंगल मंडलात येतं. जितराब राखण्यासाठी या प्राण्याच्या मालकांकडून त्यांना वर्षाला १,२०,००० रुपये मिळतात. घरी जाणं केवळ घरच्यांना भेटण्यासाठी नसतं, या पगारातली थोडी रक्कम घेऊन येता येते. आता गावी परतणं शक्य नसल्यामुळे बालासामी आणि इतरांकडचे पैसे लवकरच संपणार आहेत. “माझी बायको, पोरं आणि आईला कसं भेटायचं, सांगा? ‘उप्पू-पाप्पू’ (मीठ-मिरची, डाळ-तांदूळ) कसं आणायचं?” बालासामी विचारतात. “बसगाड्या कधी सुरू होणार असं तुम्हाला वाटतंय?”

कधी कधी पैसा लागणार असला तर मेंढपाळ एखाद दुसरं शेरडू-मेंढरू विकतात. पण या बंदीमुळे गेल्या आठवड्यापासून त्यांच्याकडे तसं गिऱ्हाईकही आलेलं नाही.

Left: The flock being herded away after a farm family wouldn't allow them to graze in their fields. Right: A harvested cotton field, with barely any fodder. The travel restrictions under the lockdown are making the herders’ search for fodder even more difficult
PHOTO • Harinath Rao Nagulavancha
Left: The flock being herded away after a farm family wouldn't allow them to graze in their fields. Right: A harvested cotton field, with barely any fodder. The travel restrictions under the lockdown are making the herders’ search for fodder even more difficult
PHOTO • Harinath Rao Nagulavancha

डावीकडेः एका शेतकरी कुटुंबाने आपल्या रानात जितराब बसवू न दिल्यामुळे पुढच्या वाटेवर निघालेला कळप. उजवीकडेः कपास निघालीये, रानात फारसा चाराही नाही. संचारबंदीमुळे प्रवासावर मर्यादा आल्या आणि पशुपालकांचा चाऱ्यांचा शोध अजूनच खडतर झालाय

एरवी आपापल्या गावी परतण्याआधी पशुपालक मिर्यालागुडा नगरात पोचतात. आता ते कोप्पोले गावाजवळ आहेत तिथून हे गाव ६० किलोमीटरवर आहे. या गावाच्या भोवताली जी गावं आहेत तिथे एप्रिलमध्ये भात काढल्यानंतर भरपूर चारा असतो. पण आता प्रवासावर बंधनं आल्यामुळे या शेवटच्या ठिकाण्यापर्यंत हे सगळे पोचण्याची शक्यता धूसर झाली आहे.

आता जितराबाला पोटाला घालायलाच लागणार, त्यामुळे चाऱ्याचा शोध काही थांबणार नाही. आणि जूनमध्ये पाऊस सुरू होण्याआधी गावी परतण्याचा पर्यायदेखील उपयोगाचा नाही कारण तिथे तर कसलाच चारा उपलब्ध नाही. “आमचा भाग म्हणजे सगळा डोंगराळ पट्टा आहे [ऑक्टोबरच्या शोवटापर्यंत सगळ सुकून जातं],” तिरुपतय्या सांगतात. “गावात जितराब देखील भरपूर आहे – आमच्या स्वतःच्या गावातच २०,००० जितराब असेल. त्यामुळे आम्हाला भटकंतीवाचून पर्याय नाही.”

आपण ठीक आहोत हे कसंही करून आपल्या घरच्यांना कळवण्याचा प्रयत्न बालासामी करतायत. “आता हे फोनसुद्धा बंद करणारेत का काय?” ते विचारतात. “मग तर लोक जिवंत आहेत का मेले तेदेखील कळणार नाही. लोक सांगायला लागलेत की ही बंदी तीन महिने चालणार म्हणून. तसं झालं तर त्या आजारापेक्षा या बंदीमुळेच जास्त जीव जातील बघा.”

अनुवादः मेधा काळे

Harinath Rao Nagulavancha

हरिनाथ राव नागुलवंचा लिंबू वर्गीय फळांची शेती करतात आणि ते तेलंगणातील नलगोंडास्थित मुक्त पत्रकार आहेत.

यांचे इतर लिखाण Harinath Rao Nagulavancha
Translator : Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.

यांचे इतर लिखाण मेधा काळे