शंकर वाघेरे आपली प्लास्टिकची पिशवी जमिनीवर टाकतात आणि काठीवर रेलून जरा श्वास घेतात. त्यानंतर ते खाली झुकतात आणि डोळे मिटून घेतात. पुढची १५ मिनिटं काही ते डोळे उघडत नाहीत. ६५ वर्षांचे वाघेरे आज खूपच अंतर चाललेत. त्यांच्या भोवती, रात्रीच्या अंधारात जवळ जवळ २५,००० शेतकरी बसले आहेत.
“आम्हाला आमच्या हक्कांसाठी लढावंच लागणार,” ते म्हणतात. इगतपुरीच्या रायगडनगर भागात मुंबई-नाशिक महामार्गावर त्यांचा मुक्काम आहे. ६ मार्च, मंगळवारी दुपारी शेतकऱ्यांचा जो विराट मोर्चा मुंबईच्या दिशेने निघाला, त्याचा हा आजचा पहिला मुक्काम. रविवारी, ११ मार्च रोजी मुंबई गाठायची असं या शेतकऱ्यांचं नियोजन आहे. आणि त्यानंतर विधानसभेला बेमुदत घेराव घालायचा – सरकारने केलेल्या फसवणुकीचा निषेध व्यक्त करायचा.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची शेतकरी संघटना असलेल्या अखिल भारतीय किसान सभेने हा लाँग मार्च आयोजित केला आहे. या मोर्चाचे एक संयोजक आणि किसान सभेचे जनरल सेक्रेटरी अजित नवले सांगतात की केवळ बाता मारून सरकार निभावून नेऊ शकत नाही. “२०१५ मध्ये आम्ही शेतकऱ्यांचे वन जमिनीवरचे हक्क, शेतमालाला चांगला भाव, कर्जमाफी आणि अशा इतर मागण्या घेऊन निदर्शनं केली होती,” ते सांगतात. “सरकार दिलेला शब्द पूर्ण करत असल्याचा केवळ दिखावा करत आहे. या वेळी मात्र करो या मरो असाच आमचा लढा असणार आहे.”









