* * *
१ ऑगस्ट, मी लातूरला पोचलो तर दिवसाची सुरुवात एका चांगल्या बातमीने होते. राज्य शासनाने विम्याचा हप्ता भरण्याची अंतिम मुदत ४ ऑगस्टपर्यंत वाढवली आहे, आणि शेतकऱ्यांना या लांब रांगांमध्ये आपला नंबर लागतो का हे आजमावण्यासाठी आणखी चार दिवस मिळालेत.
लातूरच्या जळकोटमधल्या स्टेट बँकेच्या शाखेतून ४० वर्षांचे नागेश केंद्रे बाहेर पडतात, ते आपल्या कुंडलीतल्या ग्रहताऱ्यांना धन्यवाद देतच. त्यांची १० एकराची शेती पाच जणात विभागली आहे – तीन भाऊ आणि आई-वडील. बँकेचा आग्रह होता की कुटुंबातल्या प्रत्येकाने वेगळा अर्ज भरावा. “माझा भाऊ लोह्याला शिकायला आहे, इथनं ५० किलोमीटर लांब,” ते म्हणतात. “इथे आम्ही दिवस दिवस रांगेत थांबायलोय, विम्याचा हप्ता भरायला तो त्याचं शिक्षण सोडून कसा यावा? आणि मी म्हणतो घरातल्या प्रत्येकाने वेगळा अर्ज करायची गरजच काय? जर सगळी कागदपत्रं नीट असली तर मी त्यांच्या वतीने का अर्ज भरू नये? सगळेच इथं बारीला लागले तर शेतात कोन बघावं? मी त्यांच्याशी भांडलो तवा कुटं बँकवाले ऐकालयेत. जर ही मुदत वाढवली नसती, तर माझी लईच परेशानी होत होती.”
मात्र ही सुटका थोड्याच काळासाठी होती. २ ऑगस्टला सकाळी ११ वाजता बँकेला अजून एक अधिकृत ईमेल येते – ऑफलाइन - प्रत्यक्ष अर्ज स्वीकारू नयेत – ऑनलाइन अर्जांसाठी मात्र ४ ऑगस्टची अंतिम मुदत लागू असेल. या सगळ्या कोलांट उड्यांबाबत मी बीडच्या तळखेड शाखेचे व्यवस्थापक गणेश म्हस्केंना फोन लावला. “आज बँकेपुढे जवळपास १०० शेतकरी गोळा झाले होते,” ते सांगतात. “मी १६०० अर्ज स्वीकारलेत. मी त्यांना सांगितलं की मी आता काहीही करू शकत नाही. त्यांनी त्यांचा निषेध व्यक्त केला आणि सगळे ईमेल सेवा केंद्राकडे रवाना झाले.”
तळखेडचं ईमेल सेवा केंद्र बँकेपासून काही मीटरच्या अंतरावर आहे. जास्तीत जास्त ६-८ लोकं तिथे आत थांबू शकतात. संतोष गायकवाड नावाचा युवक हे केंद्र चालवतो. ३० जुलैला त्याने मला सांगितलं होतं की वेबसाइटला इतका भार झेपत नाहीये (http://agri-insurance.gov.in). “डाइनलोड, स्कॅनिंग, अपलोड, ऑनलाइन पैसे भरणा – या सगळ्याला खूप जास्त वेळ लागतो,” तो म्हणाला. “त्यात जर सर्व्हर मध्येच बंद पडला, तर परत सगळी प्रक्रिया पूर्ण करावी लागते.” एका आठवड्यात दिवस रात्र केंद्र चालू ठेवूनही फक्त ३० शेतकऱ्यांचे अर्ज अपलोड होऊ शकलेत. अजून १०० जण आशेने, अस्वस्थपणे उभे आहेत.
ता.क. ३१ जुलैपर्यंत केवळ ३९ लाख अर्ज स्वीकारण्यात आले असं राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी या वार्ताहराला सांगितलं. २०१६ मध्ये १ कोटी ९ लाख शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केले असं मार्चमध्ये जेव्हा या योजनेसाठी आधार नोंदणी सक्तीची करण्यात आली तेव्हा राज्य शासनाने जाहीर केलं होतं. शासनाने २०१७ साठीची आकडेवारी गोळा केलेली नसली तरी यंदा अर्जांची संख्या आणि केवळ चार दिवसाची, ४ ऑगस्टपर्यंतची मुदत वाढ पाहता, गेल्या वर्षीइतके अर्ज आले असतील अशी शक्यता वाटत नाही.
फुंडकरांचं मात्र असं सांगणं आहे की या आकड्यांचा वेगळ्या पद्धतीने विचार करायला हवा. “मागच्या वर्षीपर्यंत आम्ही पिकांच्या संख्येनुसार पीक विमा घेत होतो. त्यामुळे जर शेतकऱ्याची चार पिकं असली तर तो चार अर्ज भरत असे. यंदा ‘एक शेतकरी, एक अर्ज’ अशी पद्धत केल्यामुळे अर्जांची संख्या घटली आहे. आम्ही फक्त ५ ऑगस्टला प्रत्यक्ष, ऑफलाइन अर्ज स्वीकारले आणि त्या एका दिवसात १,२७,००० अर्ज आले. १ ते ४ ऑगस्ट आम्ही फक्त ऑनलाइन अर्जच घेतले. एकूण अर्जांची संख्या ७० लाख असेल असा आमचा अंदाज आहे.”
फोटोः पार्थ एम एन
अनुवादः मेधा काळे