‘‘लॉकडाऊनमध्ये कामच न मिळालेल्या आमच्यासारख्या अनेकांना जनकीय हॉटेल हा मोठा आधार आहे,’’ आर. राजू सांगतात. तिरुवनंतपुरममध्ये एम. जी. रोडजवळच्या आऊटलेटमधून लंच पॅकेट घेण्यासाठी ते रांगेत उभे आहेत.
५५ वर्षांचे राजू सुतारकाम करतात. महिन्याभरापेक्षा अधिक काळ रोज तीन किलोमीटर सायकल मारत ते येतायत, जनकीयमधून २० रुपयांत जेवण घेण्यासाठी. या जेवणात भात, लोणचं, तीन प्रकारच्या आमट्या असतात. आणि असतं ‘व्हेजिटेबल थोरन’ (केरळी पद्धतीने परतलेल्या भाज्या), जे राजूच्या मते सगळ्यात ‘बेष्ट’ असतात!
‘‘लॉकडाऊन जाहीर झाला तेव्हा मला खरं तर भीतीच वाटायला लागली,’’ राजू सांगतात. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आर. राजू यांना कामच मिळालेलं नाही. ‘‘गाठीला खूपच थोडे पैसे होते. दोन महिने आपण खाणं विकत घेऊ शकणार नाही, असंच मला वाटत होतं. पण इथे मला महिन्याचं जेवण फक्त ५०० रुपयात मिळतंय.’’
कॉल सेंटरमध्ये काम करणारा टी. के. रविंद्रनसुद्धा जनकीय हॉटेलच्या स्वस्त जेवणावरच अवलंबून आहे. एम.जी. रोडपासून तीन किलोमीटरवर असलेल्या तिरुवनंतपुरमच्या पेटा भागात रविंद्रन एकटाच भाड्याच्या घरात राहातो. दुपारचं जेवण तो त्याच्या ऑफिसच्या कँटीनमध्ये घेत असे. पण २३ मार्चपासून ऑफिसच बंद झालं. देशात २५ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर झाला, त्याच्या दोन दिवस आधीच केरळ सरकारने राज्यात लॉकडाऊन केला होता. ‘‘इतर खानावळी बऱ्याच महाग आहेत. त्यांचे घरपोच खाण्याचे दरही खूप आहेत,’’ रविंद्रन म्हणतो. ७० किलोमीटरवर असलेल्या कोल्लमहून तो दोन वर्षांपूर्वी या शहरात आला.
रविंद्रन आणि राजू ज्या जनकीय आऊटलेटमध्ये जातात, तिथे दहा बायका जेवणाची पाकिटं तयार करत असतात. रोज त्या साधारण ५०० जणांचं जेवण बनवतात आणि बांधून ठेवतात. प्लास्टिकचं वेष्टण असलेल्या कागदात भात असतो, त्याला वरून वर्तमानपत्राचा कागद बांधलेला असतो. आमट्या सांडू नयेत म्हणून सिल्व्हर फॉइलच्या थैलीत दिल्या जातात. फक्त पार्सल सेवा असणारं हे ‘लोकांचं (जनकीय) हॉटेल’ आहे. सोमवार ते शनिवार सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळात तिथे जेवण उपलब्ध असतं.











